दिगंबर कामत यांची प्रतिक्रिया : केंद्राकडे सर्वपक्षीय मागणी ठेवण्याची तयारी
प्रतिनिधी / मडगाव
आपले जीवलग जगभरात कोरोनाच्या संकटकाळात अडकून पडलेले असताना, त्यांना परत मायदेशी आणण्यासाठी सरकारकडे याचना करत मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या गोमंतकीय खलाशांच्या नातलगांना अटक करणे हे धक्कादायक असल्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी म्हटले आहे. तसेच हा विषय लवकर सुटावा यासाठी सर्वपक्षीय मागणी केंद्र सरकारकडे ठेवण्याची तयारी काँग्रेस पक्षाने केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गोमंतकीय तसेच भारतातील इतर राज्यातील खलाशांनी देशाच्या व गोवा राज्याच्या अर्थव्यवस्थेला तसेच विदेशी चलन मिळवून देण्यास भरीव असे योगदान दिले आहे. आज कठीणप्रसंगी त्यांच्या कुटुंबियांना मानसिक बळ देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याच्या उलट त्यांना अटक केली जाते हा प्रकार योग्य नसल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी म्हटले आहे.
गोव्याच्या दाबोळी विमानतळावरुन सुमारे 22 विमानानी इंग्लंड, जर्मनी, स्विडन, स्विर्झलेंड, रशिया येथील सुमारे 3 ते 4 हजार नागरिकांना घेऊन लॉकडाऊन काळात उड्डाण केले आहे. यात कोरोनाची सर्वाधिक झळ बसलेल्या इटली व स्पेनच्या नागरिकांचाही समावेश आहे. यावरुन, सदर देशांनी लॉकडाऊन काळातही आपल्या नागरिकांना सुखरुप आपल्या मायदेशी परत घेतल्याचे स्पष्ट होत आहे.
गोवा सरकारने युद्धपातळीवर पाठपुरावा करावा
गोवा सरकारने युद्धपातळीवर भारत सरकारकडे पाठपुरावा करुन, सर्व गोमंतकीय खलाशांना परत आणण्यासाठी त्वरित पाऊले उचलणे गरजेचे आहे. यासाठी प्रसंगी केंद्र सरकारकडे सर्वपक्षीय मागणी ठेवायची असल्यास त्यास आम्ही संपूर्ण पाठिंबा देण्यास तयार आहोत असे म्हटले आहे.









