समांतर-1 च्या दुसऱया सीझन विषयी काय सांगशील?
खूप आनंद वाटतोय. लोकांनी याची वर्षभर वाट पाहिली आहे. ‘समांतर-2’ हा सुहास शिरवळकर यांच्या पुस्तकाचा उत्तरार्ध आहे. पूर्वार्धात काय घडलं ते आपण पाहिलं. पूर्वार्धासाठीची ओढ अशी होती की, त्याला डायऱया मिळतील का? कारण त्या डायऱयांमध्ये त्याचं भविष्य आहे. आता त्याचं भविष्य त्याच्या हातात आलं आहे. आता गंमत ही आहे की त्याच्या आयुष्यात घडणाऱया सर्व घटना त्याला आता माहिती आहेत आणि असं असताना तो आता त्या बदलू शकेल का? आता ही शर्यत आहे कुमारची त्याच्या लिखित भविष्याबरोबरची. डायऱया मिळाल्यापासून ते तो हा फेरा मोडू शकतो की नाही इथपर्यंतचा हा प्रवास आहे.
ओटीटीवर पदार्पण करण्यासाठी तू ‘समांतर’चीच निवड का केलीस?
-माझं सिम्पल लॉजिक असं होतं की, मी जे चित्रपटांमध्ये करतो, मालिकांमध्ये करतो तेच जर ओटीटी प्लॅटफॉर्मवर करणार असेन तर लोकांनी मला का बघावं? ओटीटीची आपली बलस्थानं आहेत. ओटीटीचे आपले फायदे आहेत. त्या फायद्यांचा आपण योग्य वापर नाही करू शकलो तर त्याला काही अर्थ राहणार नाही. त्यामुळे ओटीटी मी तेव्हाच करायचं ठरवलं होतं जेव्हा ती गोष्ट त्या प्लॅटफॉर्मला न्याय देऊ शकेल. ; ‘समांतर’ची गोष्ट सतीश आणि माझ्या डोक्यात सात आठ वर्षं होती. आम्ही दोघंच काय पूर्ण महाराष्ट्र सुहास शिरवळकरांचा चाहता आहे. त्यामुळे समांतर डोक्यात होतंच. जेव्हा ओटीटीवर काय करायचं, असा प्रश्न आला तेव्हा असं वाटलं की, ‘समांतर’ करूया. एमएक्स प्लेअर सारखा मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध झाल्यामुळे ‘समांतर’ प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकले. त्यामुळे एमएक्स प्लेअरचे धन्यवाद. त्यांनी ‘समांतर’कडे प्रादेशिक शो म्हणून कधीच पाहिलं नाही.
कुमार सारखीच स्वप्नील जोशीला त्याचं भविष्य जाणून घ्यायची संधी मिळाली तर तुला आवडेल का?
खरं सांगायचं तर नाही आवडणार. तुम्हाला जेव्हा तुमचं भविष्य कळेल. त्यावेळची उत्सुकता ही तेवढय़ापुरतीच असेल. भविष्य कळल्यावर आयुष्य जगण्याची मजाच निघून जाईल. आयुष्य जगताना कधी आपण आनंदी होतो तर कधी आपल्याला दुःख होतं, कधी आपल्याला आश्चर्य वाटतं. ह्या ज्या सगळ्या भावना आहेत त्या नाहीशा होतील आणि आयुष्य रटाळ होऊन जाईल. त्यामुळे नक्कीच मला ते नाही आवडणार.
दोन्ही सीझनचे दिग्दर्शक वेगवेगळे आहेत. सतीश राजवाडे आणि समीर विद्वांस या दोघांच्या दिग्दर्शनात काही फरक जाणवला का?
मला अस वाटतं की प्रत्येक दिग्दर्शक सेटवर वेगळी एनर्जी घेऊन येतो. प्रत्येक दिग्दर्शक त्याच्या कामावर वेगवेगळे संस्कार करतो. त्या प्रोजेक्टवर सतीशने जसे संस्कार केले तसे समीरने त्याचे संस्कार केले आहेत. समीर हा अत्यंत ताकदीचा अत्यंत हुशार असा मात्तबर दिग्दर्शक आहे. जितक्या कमालीने सचिनने काम केले होते तितक्यचा ताकदीने समीरने समांतर 2 ला चारचाँद लावले









