215 कोटीचे होते उद्दिष्ट : केवळ 45.37 टक्केच पूर्ती : बँकांच्या उदासीनतेवर शेतकरी नाराज
प्रतिनिधी / ओरोस:
खरीप हंगामासाठी शेतकऱयांना कर्ज देण्याची टक्केवारी गाठण्यात राष्ट्रीयकृत बँका बऱयाच मागे पडल्या आहेत. 215 कोटी 17 लाखाच्या उद्दिष्टाच्या बदल्यात 30 सप्टेंबरअखेर केवळ 97 कोटी (45.37 टक्के) कर्जवाटप या बँकांकडून झाले आहे.
दरम्यान महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेंतर्गत पात्र यादीत नाव असूनही कर्जमाफीची रक्कम न मिळाल्याने अनेक शेतकरी थकबाकीदार असल्याचे दाखवून यावर्षीचे कर्ज देण्यास राष्ट्रीयकृत बँकांनी नकार दिल्याची बाब समोर आली आहे. बँकांच्या या कार्यपद्धतीबाबत संबंधित शेतकऱयांनी जिल्हा सहकारी उपनिबंधकांकडे तक्रारी केल्या आहेत.
शेतकऱयांना आधुनिक पद्धतीने शेती करता यावी, यासाठी आवश्यक असणारे अर्थसहाय्य मिळावे या करिता शेतकऱयांना खरीप व रब्बी हंगामासाठी कर्ज दिले जाते. हे कर्ज किती द्यावे याबाबतचे उद्दिष्टही ठरवून दिले जाते.
राष्ट्रीयकृत बँकांकडून 45.37 टक्के कर्ज वाटप
जिल्हय़ात कार्यरत असलेल्या राष्ट्रीयकृत बँकांना 30 सप्टेंबरपर्यंतच्या खरीप हंगामासाठी शेतकऱयांना 215 कोटी 17 लाख रुपयांचा कर्जपुरवठा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात 7478 शेतकऱयांना 97 कोटी 62 लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. ही टक्केवारी केवळ 45.37 टक्के असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
2019 च्या खरीप हंगामात राष्ट्रीयकृत बँकांना 168 कोटी 64 लाखांचा लक्षांक देण्यात आला होता. 12845 शेतकऱयांना त्यांच्या 27603 हेक्टर क्षेत्रासाठी 144 कोटी 50 लाखांचे कर्ज वितरण करण्यात आले होते. ही टक्केवारी 84.74 टक्केवर पोहोचली होती. या तुलनेत यावर्षी राष्ट्रीयकृत बँका खरीप हंगाम कर्ज वितरणात बऱयाच मात्रे असल्याचे चित्र आहे.
कर्ज वितरणाच्या बाबतच्या उदासीनतेबाबतची माहिती घेतली असता शासनाच्या सन 2019 च्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेचे पैसे अद्याप न आल्याने थकबाकीदार म्हणून दिसत असलेल्या शेतकऱयांना या बँकांनी कर्ज देण्यास नकार दिला असल्याचे शेतकऱयांकडून सांगण्यात येत आहे. अनेक शेतकऱयांनी याबाबत तक्रार केली असल्याच्या वृत्ताला सहकार जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून दुजोरा देण्यात आला आहे.
जिल्हा बँकेची 105 टक्केची पूर्तता
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 105.07 टक्के कर्ज वाटप केले आहे. जिल्हा बँकेला 85 कोटी 25 लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार 19677 शेतकऱयांना 19143 हेक्टर क्षेत्रासाठी 30 सप्टेंबरअखेर 89 कोटी 56 लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे.
ग्रामीण बँक : 125.45 टक्के
ग्रामीण बँकेला 10 कोटी 57 लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या बँकेने 1336 सभासद शेतकऱयांना 13 कोटी 26 लाखांचे कर्जवाटप करून 125.45 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे.
सर्व बँकांची कर्जवाटपाची टक्केवारी 64.45 टक्के
जिल्हय़ातील राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि ग्रामीण बँकांना मिळून खरीप हंगाम 2020 साठी 311 कोटी कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. 28491 शेतकऱयांना 200 कोटी 44 लाख 80 हजारांचे कर्ज वितरण झाले आहे. दरम्यान यावर्षी एकाही नवीन सभासदाला कर्ज वितरण झाले नसल्याची बाब ही स्पष्ट झाली असून राष्ट्रीयकृत बँकांच्या उदासीन धोरणाबाबत शेतकऱयांकडून नाराजी व्यक्त होत आहे.









