परतीच्या पावसाचा परिणाम, हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान, भात पिकाला सर्वाधिक फटका
कृष्णात चौगले/कोल्हापूर
हवामान विभागाने 15 ऑक्टोबरपर्यंत परतीचा पाऊस लागणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार गेले चार दिवस दुपारनंतर जिह्यात जोरदार पाऊस होत आहे. सध्या खरीप पीक काढणीचा हंगाम सुरु आहे. पण या पावसामुळे काढणीच्या कामात व्यत्यय निर्माण झाला असून हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याची भिती आहे. सध्या भात पीक परिपक्व होऊन ते काढणीस आले आहे. पण परतीच्या पावसाच्या तडाख्यामुळे अनेक ठिकाणचे भात पीक भुईसपाट झाले असून भुईमूग पिकालाही पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. तर जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात ओलावा निर्माण झाल्यामुळे रब्बी हंगामाच्या पूर्वतयारीलाही ब्रेक लागला आहे.
जिह्यात 2 लाख 64 हजार हेक्टरवर खरीप पेरणी झाली आहे. यामध्ये भात (1 लाख हेक्टर), ज्वारी, नागली, सोयाबिन, भुईमुग, मका, मुग, उडीद, इतर कडधान्ये व भाजीपाल्यांचा समावेश आहे. सध्या सोयाबिन पिकाची काढणी सुरु आहे. भात पिकांमध्ये हळव्या जातीच्या (काढणीस लवकर येणारे पिक) पिकांची काढणी सुरु आहे. एकूण भात पिकापैकी सुमारे 34 ते 35 टक्के याचे क्षेत्र असते. तर 70 टक्के भात पिकाची उशिरा म्हणजेच ऑक्टोबरच्या पूर्वार्धात काढणी केली जाते. त्यामुळे जिह्यात सर्वत्र भात पिक काढणीची लगबग आहे. पण परतीच्या पावसामुळे त्यामध्ये अडथळा निर्माण झाला आहे. तसेच काढणीस आलेल्या पिकास जोरदार पावसाचा तडाखा बसल्यामुळे अनेक ठिकाणी भात पिक भुईसपाट होऊन पक्व दाणे जमिनीवर झडले आहेत. हेक्टरी सरासरी 54 ते 100 क्विंटलपर्यंत भाताचे उत्पादन होते. पण पावसामुळे अनेक शेतकऱयांच्या उत्पादनात घट होणार आहे. गेल्या 8 ते 10 दिवस पावसाची उघडीप असल्यामुळे या कालावधीत हळव्या भात पिकांची काढणी मात्र शंभर टक्के पूर्ण झाली आहे. नाचणी आणि ज्वारीची काढणी ऑक्टोबरच्या उत्तरार्धात अथवा नोव्हेंबर महिन्यामध्ये केली जाते. तर पक्व झालेल्या भुईमूग काढणीमध्ये पावसाचा अडथळा निर्माण झाला आहे.
जोरदार पावसामुळे जिह्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. अतिवृष्टीमुळे जिह्यामध्ये आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या ऊस पिकांसह खरीप पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रशासनाने पूरबाधित पिकांचे पंचनामे केले असले तरी, भरपाई किती व कधी मिळणार ? असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकऱयांना भेडसावत आहे. पूरबाधित पिकांचे पंचनामे करण्याचे काम सुरु असतानाच परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावे लागतात की काय ? अशी स्थिती निर्माण झाली आहे. दरवर्षी सर्वसाधारणपणे सप्टेंबरच्या पूर्वार्धापर्यंत मोसमी पाऊस टिकतो. त्यानंतर परतीचा पाऊस सुरु होतो. याच कालावधीत खरीप पिकांच्या काढणीचा हंगाम असल्यामुळे त्याचा शेतकऱयांना फटका बसतो.
रब्बी हंगामाच्या तयारीत अडथळा
जिह्यात साधारणपणे 1 ऑक्टोबरपासून रब्बी हंगाम सुरु होतो. यामध्ये काही शेतकरी ऑक्टोबरच्या पूर्वार्धात तर काही उत्तरार्धात पेरणी करतात. सध्या शेतकऱयांनी रब्बीची पेरणी पूर्णपणे खोळंबली आहे. रविवारी झालेल्या जोरदार परतीच्या पावसामुळे पूर्वमशागतीच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे. जिह्यात रब्बीचे 22 हजार हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये साडेअकरा ते बारा हजार हेक्टरमध्ये ज्वारी, तीन ते साडेतीन हजार हेक्टरमध्ये गहू, तर सात ते साडेसात हजार हेक्टरमध्ये हरभरा पीक घेतले जाते. यापैकी गहू पिकाची पेरणी नोव्हेंबरमध्ये केली जाते. पण ज्वारी आणि हरभराची पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवडÎात केली जाते. पावसामुळे या पेरणीमध्ये व्यत्यय निर्माण झाला आहे.
पाऊस थांबल्यानंतरच खरीप काढणीला येणार वेग
हवामान विभागाच्या अंदाजानुसार 15 ऑक्टोबरपर्यंत पावसाची शक्यता आहे. गेले दोन दिवस जिह्यात दुपारनंतर पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे शेतजमिनीमध्ये पाणी साचले आहे. परिणामी परतीचा पाऊस थांबल्यानंतरच खरीपाची काढणी करावी लागणार आहे.
आडसाली ऊस लावणीसाठी पोषक
जिह्यात जुलै ते सप्टेबर या कालावधीत आडसाली ऊस लावण केली जाते. एकूण ऊस लावणीपैकी सुमारे 30 ते 35 टक्के आडसाली लावण असते. या लावणींची उगवण झाली असून वाढीच्या अवस्थेत आहे. परतीचा पाऊस आडसाली लावणीसाठी पोषक आहे.