ऑनलाईन टीम/तरुण भारत
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी देशाच्या संसदेमध्ये मोदी सरकारवर परखड शब्दांत टीका केली होती. राहुल गांधी यांनी दोन भारत आहेत एक अतिशय श्रीमंतांचा भारत आणि दुसरा गरीबांचा. या दोन्ही भारतांच्या दरम्यानची दरी दिवसेंदिवस वाढत आहे, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आज पुन्हा छत्तीसगडमध्ये बोलताना राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं. “७० वर्षांत काय झालं? असा प्रश्न तुम्ही उपस्थित करता, तेव्हा तुम्ही काँग्रेसचा नाही तर हा देश घडवणाऱ्या गरीबांचा, शेतकऱ्यांचा, त्यांच्या आई-वडिलांचा अपमान करता”, असं राहुल गांधी म्हणाले आहेत. यासोबतच राहुल गांधी यांनी यावेळी भाजपा भारतात दोन देश करू पाहात आहे, या आपल्या विधानाचा देखील पुनरुच्चार यावेळी केला.
“भाजप आणि त्यांची विचारधारा आपल्या प्रिय देशाला धोक्याच्या दिशेने घेऊन जात आहे. मी काल संसदेत हे समजावून सांगितलं. आजही तुम्हाला सांगतो. धोका कोणत्या गोष्टीचा आहे? सगळ्यात पहिला भयंकर धोका म्हणजे भाजप आज एक देश दोन देशांमध्ये विभागतंय. भाजप दोन नवे देश करण्याचा प्रयत्न करत आहे. एक देश आहे तो निवडक करोडपतींचा. त्या देशात विमाने, अद्ययावत तंत्रज्ञान, स्टॉक मार्केटचा पैसा.. त्या देशात जेवढी देशाची संपत्ती तुम्हाला हवी, तुम्ही घेऊ शकता. तर दुसरा देश आहे तो आपल्या प्रिय देशवासीयांचा, कोट्यवधींचा देश”, असं राहुल गांधी म्हणाले.
“एक श्रीमंत देश शे-पाचशे लोकांचा आणि दुसरा देश भारतातल्या कोट्यवधी नागरिकांचा. त्यांना वाटतं दोन देश बनवल्यामुळे गरीबांचा देश शांत बसून राहील. गरिबांमध्ये शक्ती नाही. भारतातला गरीब घाबरतो. पण हिंदुस्थानमधला गरीब घाबरत नाही”, असं देखील राहुल गांधी म्हणाले.