सध्या देशभरात विशेषतः महाराष्ट्रात लोक सिनेसृष्टीतील कलाकारांच्या अमली पदार्थाचे सेवन याबद्दल खूप चर्चा करताना दिसत आहेत. एन.सी.बी. अर्थात अमली पदार्थ नियंत्रण विभागातर्फे दररोज कुणाचे ना कुणाचे नाव पुढे येत आहे. त्यावर निरनिराळय़ा वाहिन्यांवर चर्चासत्रेही चालू आहेत. या चर्चासत्रांमध्ये अमली पदार्थ सेवन करण्याबाबत निरनिराळे मतप्रवाह दिसून येतात. कोणी म्हणतात यात काय विशेष आहे, हे तर कित्येक वर्षांपासून राजरोसपणे सुरू आहे. तथाकथित उच्चभ्रू लोकांमध्ये याला जीवनातील आनंदाचा एक भाग म्हणून स्वीकारले जाते. सिगारेट, दारू, अफू, गांजासारखे अमली पदार्थ नैतिक अनैतिक रूपाने बाजारात सर्रास उपलब्ध आहेत. मग त्याचा आनंद घेतला तर कुठे बिघडले? ते स्वतःचा पैसा खर्च करतात मग त्याला दुसऱयांचा आक्षेप का असावा. शिवाय आपल्याला घटनेने व्यक्तिस्वातंत्र्यपण दिलेले आहे. त्याला प्रतिसाद म्हणून काही संवेदनशील लोक म्हणतात की अमली पदार्थ शरीर, मन, आरोग्य यासाठी घातक आहेत. भारतातील तरुण पिढी या सिनेसृष्टीतील नटनटय़ांना पाहून, त्यांना आदर्श मानून तेही अशा अमली पदार्थांचे सेवन करतात. हे सहजतेने मिळत नाहीत म्हणून जास्त पैसे देऊन ते मिळवण्यासाठी चोरी करून, फसवेगिरी करून वाममार्गाने पैसे मिळवतात. त्यामुळे त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या गोष्टीकडे म्हणजे शिक्षण, व्यवसाय, नोकरी, वैवाहिक आणि कौटुंबिक जीवन यावर वाईट परिणाम होतो. अमली पदार्थ सेवन केल्याने घेणाऱयांवर दुष्परिणाम तर होतोच पण समाजही त्यामध्ये नाहक भरकटला जातो. अमली पदार्थामुळे कितीतरी लोकांचे जीवन उद्ध्वस्त झालेले आपण समाजामध्ये पाहतो.
या सर्व गोष्टी खऱया असल्या तरी माझे लक्ष वेधले गेले ते या अमली पदार्थांचा धर्माशी संबंध लावला गेला म्हणून. काही लोक वाद करत होते की भारतामध्ये ज्यांना सज्जन मानले जाते ते साधुसुद्धा गांजा पितात, अफूचे सेवन करतात, भांग पितात. मग इतरांनी त्यांचे अनुकरण केले तर काय बिघडले? आणि ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. वैराग्याची भगवी वस्त्रे धारण करून राजरोसपणे सिगारेट, बिडी, दारू, गांजा, अफू, भांग यासारखे अमली पदार्थ सेवन करणारे साधू आपण पाहतो. त्यांना समाजांमध्ये ‘साक्षात्कारी’ म्हणून प्रति÷ासुद्धा प्राप्त होते. असे लोक म्हणतात की हिंदू देवता शिवशंकर गांजा, भांग पितात. पण ही वस्तुस्थिती आहे का याचा कधी कोणी विचार का करत नाहीत?
कुठल्याही वेद शास्त्र पुराणांमध्ये भगवान शंकर गांजा किंवा भांग पितात असे वर्णन नाही. जरी समजा शंकराचे त्यासाठी जरी असे लोक अनुकरण करत असतील तर मग समुद्रमंथनच्या वेळी त्यांनी जहाल विषही प्राशन केले होते. मग हे लोक विष का पीत नाहीत? तात्पर्य काय तर गांजा अफूसारख्या अमली पदार्थ सेवन करण्याऱया तथाकथित साधूंचा धर्माशी काहीही संबंध नाही. ही धर्माचे संपूर्ण ज्ञान नसलेल्या लोकांची निव्वळ एक अंधश्रद्धा आहे.
याउलट श्रीमद् भागवतमध्ये वर्णन आहे की शिवजी हे तामसिक गुणांचे अधि÷ाता आहेत, पण स्वतः ते तामसिक गुणांमध्ये नाहीत. ते भूत, प्रेत, पिशाच्च अशा अधोगती प्राप्त झालेल्या जीवांसाठी स्मशानासारख्या जागी राहून, अंगावर भस्म लावून, गळय़ामध्ये कवटय़ांची माळ घालून, जटा धारण करून त्यांना आकर्षित करण्यासाठी ध्यानस्थ बसतात. अशा शंकर भगवान यांच्या हातामध्येही आपण जपमाळ पाहतो. मग ते कोणाच्या नावाचा जप करतात? आपली पत्नी पार्वतीला ते हे रहस्य सांगतात,
राम रामेती रामेती, रमे रामे मनोरमे ।
सहस्त्रनाम तत्तुल्यम, रामनाम वरानने ।।
अर्थात दिव्य रामनामाचे चिंतन केल्याने माझे मन आणि चेतना राममय होते, इतर कोणत्याही देवतांच्या हजार नामाच्या तुलनेत एक राम नाम सर्वश्रे÷ आहे. (पद्म पुराण) याचसाठी काशी येथे मणिकर्णिका घाटावर गंगेकाठी निवास करून शिवजी मृत्यूमुखी असलेल्या जीवांचा उद्धार करण्यासाठी त्यांच्या कानात तारकमंत्र म्हणजे रामनाम उच्चारण करतात. त्याचप्रमाणे श्रीमद्भागवतच्या 4 थ्या स्कंधामध्ये शिवजी कुणाचे नित्य चिंतन करतात याचे रहस्य स्वतः शिवजीच सांगतात,
सत्त्व विशुद्ध वसुदेवशब्दतिंयदीयते तत्र पुमानपावृत: ।सत्त्वे च तस्मिन्भगवान्वासुदेवोह्यधोक्षजो मे नमसा विधीयते ।
अर्थात ‘मी विशुद्ध कृष्णभावनेमध्ये भगवान वासुदेवाना सदैव वंदन करण्यात निमग्न असतो. कृष्णभावना सदैव विशुद्ध चेतना असते आणि वासुदेव म्हणून ओळखले जाणारे परम भगवंत कोणत्याही आवरणात न राहता अशा चेतनेत प्रकट होतात’. तसेच सर्व देवतांमध्ये आराध्य कोण हे पार्वतीला सांगताना शिवजी म्हणतात आराधनानाम सर्वेषाम विष्णोर आराधानं परम
म्हणजे सर्व पूजेमध्ये विष्णुपूजा सर्वश्रेष्ट आहे (पद्मपुराण). म्हणूनच शिवजींना भागवतमध्ये वैष्णवानाम यथा शंभो सर्व वैष्णवांमध्ये श्रेष्ट गणले आहे.
असे हे थोर शिवजी स्वतःच्या उदाहरणांवरून भागवत्भक्ती कशी करावी शिकवतात. त्यांनी भगवत्भक्तीसाठी गांजा, अफू, भांग सेवन करावे असे कुठेही सांगितले नाही. हा केवळ कलियुगाच्या प्रभावामुळे स्वतःच्या मनाप्रमाणे वागण्याऱया तथाकथित साधूंचा अनैतिक आणि शास्त्राविरुद्ध निषिद्ध व्यवहार आहे. अशा ढोंगी साधु-संतांचा निषेध करताना संत तुकाराम महाराज म्हणतात,
ऐसे संत झाले कळी । तोंडी तंमाखूची नळी ।। 1 ।।
स्नानसंध्या बुडविली । पुढे भांग वोढविली ।।2।।
भांगभुकी हे साधन । पची पडे मद्यपान ।।3।।
तुका म्हणे अवघे सोंग ।तेथे कैचा पांडुरंग ।।4।।
सर्व काळ तंबाखू भरून गुडगुडी ओढणारे संत सध्या या कलियुगामध्ये खूप झाले आहेत. स्नानसंध्यादि शुद्ध आचार सोडून त्यांनी भांग ओढण्याची कला आत्मसात केली आहे. भांग वाटून पिणे, तंबाखू निरनिराळय़ा रीतीने खाणे, दारू, चहा, कॉफी पिणे (चहा आणि कॉफी ही पेये ब्रिटिशांनी भारतात आणली) याची त्यांना सवय झाली आहे. हे सर्व इंद्रियाच्या आधीन गेलेले ढोंगी लोक आहेत. त्यांना पांडुरंगाची भक्ती कशी प्राप्त होईल?
सांगण्याचा उद्देश एवढाच की अशा ढोंगी लोकांच्या मागे न लागता गीता भागवतमध्ये सांगितल्याप्रमाणे शुद्ध भक्ती जाणून घेऊन त्याप्रमाणे पालन करावे.
वृंदावनदास








