प्रतिनिधी/ पणजी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली काल गुरुवारी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत सरकारने खनिज वाहतुकीचे नवे दर निश्चित केले असून ट्रक ऑपरेटर्सना त्यामुळे दिलासा मिळाला आहे. उत्तर गोवा, दक्षिण गोवा ट्रक मालक संघटना, खाण कंपन्यांचे तसेच खाण खात्याचे प्रतिनिधी यांच्या संयुक्त बैठकीत हे नवे दर ठरविण्यात आले असून आता त्याची अंमलबजावणी होणार आहे.
हे नवे दर सर्वांना मान्य झाले असून मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी त्यासाठी यशस्वी शिष्टाई केल्याचे सूत्रांनी सांगितले. पहिल्या 10 कि.मी. साठी प्रति टन प्रति कि.मी. रु. 14.50, 10 ते 20 कि.मी. पर्यंत प्रति टन प्रति कि.मी. रु. 14 आणि 20 कि.मी. पुढे प्रति टन प्रति कि.मी. रु. 13.50 असा दर ठरविण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली.
डंपपासून जेटीपर्यंत अंतरासाठी दर
खनिज साठवून ठेवलेल्या (डंप) ठिकाणापासून धक्क्यापर्यंत (जेटी) वरील दराने मालाची वाहतूक करण्यात येणार आहे. डिझेलचा दरही रु. 52 प्रति लिटर असा ठरवून देण्यात आला आहे. या संदर्भात कोणतीही सरकारी अधिसूचना काढली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2021 पर्यंत ‘डंप’ खनिज मालाची वाहतूक करण्याची अनुमती अलिकडेच दिली आहे. एकूण 4 दशलक्ष टन खनिज माल ‘डंप’ स्वरुपात गोव्यात विविध ठिकाणी पडून आहे. त्याची वाहतूक आता केली जाणार आहे.
दरामध्ये दोन रुपयांनी वाढ
या बैठकीला सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर, आमदार सुभाष शिरोडकर उपस्थित होते. त्यांनी पुढाकार घेऊनच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी ट्रक मालक संघटनेच्या पदाधिकाऱयांशी बैठक घडवून आणली. खनिज माल वाहतूक दर यापूर्वी रु. 12.50 प्रति टन प्रति कि. मी. असा होता. त्यात रु. 2 ची वाढ करण्यात आली आहे.
सरकारचे अभिनंदन
नवीन हंगामात खाण उद्योग सुरू करण्यापर्यंतच हेच दर कायम राहणार असून त्यानंतर पुढील दरांबाबत विचार करण्यात येणार असल्याचा खुलासा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे. खनिज माल वाहतुकीसाठी नवा दर मिळाला म्हणून पावसकर तसेच खनिज माल ट्रक मालक संघटनेने आनंद प्रकट करून सरकारचे अभिनंदन केले आहे.
प्रति टन प्रति कि.मी.नुसार नवे दर
पहिले 10 कि.मी. प्रति कि.मी. रु. 14.50
10 ते 20 कि.मी. प्रति कि.मी. रु. 14
20 कि.मी. पुढे प्रति कि.मी. रु. 13.50









