प्रतिनिधी / वास्को
गोव्यात हलाखीची परिस्थिती निर्माण होऊ लागलेली असून अर्थव्यवस्था पूर्णपणे कोसळलेली आहे. या आर्थिक संकटात टिकून राहण्यासाठी खनिज वाहतूक हा एकमेव पर्याय उपलब्ध असून राज्य व केंद सरकारने या प्रश्नावर त्वरित निर्णय घ्यावा. केंद्र सरकारने वटहुकुम काढावा व खनिज उद्योग सुरू करावा, अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी म्हटले आहे.
कोरोना महामारीने जगभर हाहाकार माजवला आहे. आपल्या देशाची आर्थिक व्यवस्थाही कोलमडली आहे. त्यात गोव्याचाही समावेश असून गोव्यातील आर्थिक व्यवस्थेने उर्जीतावस्था प्राप्त न केल्यास गोव्यातील लोकांसमोर जीवनमरणाचा प्रश्न उपस्थित होणार आहे. देशाची स्थिती अवघड असली तरी गोवा राज्याला आर्थिक विकासासाठी खनिज उद्योग पुन्हा सुरू करण्याची संधी आहे. लॉकडाऊनमुळे गोव्यात सगळेच व्यवसाय कोसळले आहेत. पर्यटन हा गोव्यात सध्या एकच मोठा उद्योग होता ज्याच्यावर लाखो लोक अवलंबून होतो. सद्यस्थितीत हा उद्योगही पूर्णपणे कोसळलेला आहे. तो कधी पुन्हा मार्गावर येईल हे सुध्दा कुणी सांगू शकत नाही. गोव्याला आर्थिक बळकटीसाठी अन्य पर्यायच उपलब्ध नाही. त्यामुळे खनिज उद्योग हाच गोव्याचा पारंपरीक उद्योग सद्यस्थितीत गोव्याला तारू शकतो असे संकल्प आमोणकर यांनी म्हटले आहे.
त्यामुळे हा उद्योग सुरू करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारच्या मदतीने पावले उचलावीत. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी गोव्यातील खनिज उद्योग सुरू करण्यासाठी कायदा संमत करावा व वटहुकुम जारी करावा व गोव्यावरील आर्थिक संकट दूर करावे अशी मागणी संकल्प आमोणकर यांनी केली आहे.









