पतंजली योग संस्थेच्या माध्यमातून पोलीस निरीक्षक धिरज शिंदे यांनी राबविला उपक्रम
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाने निर्माण केलेल्या ताणाला सामोरे जाणे हे नवीन आव्हान ठरले आहे. हा ताण कमी करण्यासाठी खडेबाजार पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक धिरज शिंदे यांनी सोमवारी अभिनव उपक्रम राबविला. आपल्या पोलीस स्थानकाच्या कक्षेतील पोलीस आणि कर्मचाऱयांसाठी त्यांनी पतंजली योग संस्थेच्या माध्यमातून ताण कमी करणाऱया विविध व्यायामप्रकारांचे प्रात्यक्षिकासह महत्त्व पटवून देण्यात पुढाकार घेतला.
पतंजली योग समिती बेळगावचे प्रमुख किरण मन्नोळकर व मोहन बागेवाडी यांनी पोलिसांना त्यांची प्रतिकारशक्ती वाढवतील असे साधे, सोपे प्राणायामाचे प्रकार प्रात्यक्षिकासह दाखविले. किरण मन्नोळकर म्हणाले, सध्या सर्वत्र भितीचे वातावरण आहे. त्याचा आपल्या मनावर नकळत ताण येतो. हा ताण दूर करण्यासाठी प्राणायाम महत्त्वाचा आहे. त्याने आपली प्रतिकारशक्ती वाढते.
यावेळी त्यांनी कपालभाती, अनुलोमविलोम, भ्रामरी, भस्त्राrका प्राणायाम व सूर्यनमस्कार यांचे प्रात्यक्षिक दाखविले. पोलीस हे खऱया अर्थाने कोरोना योद्धे आहेत. त्यांच्यावर त्यांचे कुटुंब अवलंबून आहे. आपले शरीर निरोगी व सुदृढ तरच आपण कुटुंबाकडेही पाहू शकतो. सादर केलेले व्यायाम प्रकार पोलिसांना सेवा बजावत असताना सुद्धा करणे शक्मय आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पतंजलीतर्फे सर्वांना दिव्यधारा तेल (रोलऑन) देण्यात आले. याचे चार ते पाच थेंब पाण्यात टाकून वाफ घ्यावी. किंवा रात्री झोपताना तुपाचा दिवा लावून त्यामध्ये याचे चार थेंब टाकावेत. ज्यामुळे ऑक्सीजनची पातळी वाढु शकते, असे त्यांनी नमूद केले. पोलीस निरीक्षक धिरज शिंदे यांनी त्यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला.









