वार्ताहर /दाभाळ
उबजे-निरंकाल येथे खडी क्रशरला पंचायतीने नाहरकत दाखला दिल्याने तसेच पंचायतीच्या प्रवेशद्वाराजवळ कचरा व्यवस्थापन शेड उभारण्याच्या मुद्दय़ावरुन बेतोडा-निरंकाल पंचायतीच्या ग्रामसभेत गदारोळ माजला. यापूर्वीचे पंचायत सचिव संजय नाईक यांनी केलेला आर्थिक गैरव्यवहार, कणेव्हाळ येथील ओहोळात सोडण्यात येणारे सांडपाणी व बेकायदेशीर भंगार अड्डय़ांच्या मुद्यावरुनही जोरदार चर्चा झाली. सकाळी 10.30 वा. सुरु झालेली ग्रामसभा दु. 3.30 वा. पर्यंत चालली.
सरपंच उमेश गावडे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी सकाळी झालेल्या या ग्रामसभेला मोठय़ासंख्येन ग्रामस्थ उपस्थित होते. मागील पंचायत मंडळाने घेतलेल्या काही चुकीच्या निर्णयामुळे नवीन पंचायत मंडळाला ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. उबजे-निरकांल येथील सर्वे क्र. 58/1 मध्ये होऊ घातलेल्या खडी क्रशरला तात्पुरता नाहरकत दाखला देऊन एका अर्थाने मागील दाराने परवाना दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. ज्याठिकाणी हा क्रशर होऊ घातला आहे तेथे कष्टकरी लोकांच्या शेती बागायती व नेसर्गीक जलस्त्रोत आहेत. क्रशर सुरु झाल्यानंतर येथील जैवविविधता तसेच सथानिकांचा उदरनिर्वाह असलेली शेती धोक्यात येईल. क्रशरवर खडी फोडण्यासाठी स्फोटकांचा वापर केला जात असल्याने त्याचा नैसर्गीक जलस्त्रोतावरही परिणाम होणार आहे. शिवाय आसपासच्या घरांनाही हादरे बसतील. अशा प्रदुषणकारी प्रकल्पांना ग्रामस्थांचा विरोध असताना कुठल्याच परिस्थितीत परवाना देऊ नये अशी जोरदार मागणी करण्यात आली. ग्रामस्थांचा विरोध असल्यास या प्रकल्पाला पंचायत परवानगी देणार नसल्याचे सरपंचानी स्पष्ट केले.
सचिवाच्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी दक्षता खात्यामार्फत करा
पंचायत कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ कचरा प्रकल्प उभारण्याची प्रक्रीया सुरु असून त्याला ग्रामस्थांनी आक्षेप घेतला. कचरा प्रकल्प पंचायतीच्या प्रवेशद्वारात उभारला गेल्यास लोकांना दुर्गंधीच त्रास होईल. शिवाय पहिल्या मजल्यावर असलेल्या सभागृहामुळे मिळणारा महसूल बुडणार असल्याचे नागरिकांनी सांगितले. बेतोडा पंचायतीमध्ये यापूर्वी सचिव म्हणून कार्यरत असलेले संजय नाईक यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारी आहेत. तत्कालीन सरपंच दुर्गाप्रसाद वैद्य यांनी गटविकास अध्काऱयांकडे तशी लेखी तक्रार केली होती. मात्र या गोष्टीला दोन वर्षे उलटूनही कुठलीच चौकशी झालेली नाही. त्यामुळे हे प्रकरण दक्षता खात्याकडे सोपवून या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. कणेव्हाळ-बेतोडा येथील मुख्य ओहोळात शेजारील कुर्टी-खांडेपार पंचायतीमदील रहिवाशांकडून सांडपाणी उघडय़ावर सोडले जाते. त्यामुळे प्राणी प्रदूषीत झाले असून दुर्गंधीमुळे रोगराई पसरण्याचा धोका ग्रामसथांनी व्यक्त केला. पंचायतीने प्रत्यक्ष पाहणी करुन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
बोणबाग, आशेवाडा व आसपासच्या भागात गेल्या काही वर्षांपासून चालणाऱया भंगार अड्डय़ामुळे प्रदूषणाबरोबरच अन्य समस्या निर्माण झाल्याचे ग्रामस्थांनी सभेच्या निदर्शनास आणून दिले. जुन्या अड्डय़ांबरोबरच आता नवीन भंगार अड्डेही उभारले गेले असून पंचायतीच्या आशिर्वादानेच त्यांना आश्रय मिळत आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला. हे भंगारअड्डे कायमचे बंद करावेत अशी मागणी करण्यात आली. पंचायत क्षेत्रात बेकायदेशीररित्या उभारलेल्या घरांना पंचायतीने घर क्रमांक दिले आहेत, ते त्वरीत रद्द करण्याची मागणी करण्यात आली. पंचायतक्षेत्रात नियुक्त केलेला स्वयंपूर्ण मित्र नागरिकांना कधीच उपलब्ध होत नसल्याची तक्रार सभेसमोर मांडण्यात आली. हा स्वयंपूर्ण मित्र कधी उपलब्ध असतो त्याचा सविस्तर तपशील पंचायतीच्या सूचना फलकावर लावण्याची मागणी करण्यात आली.
आशेवाडा येथे बेकायदेशीररित्या खोदण्यात आलेली कुपनलिका त्वरीत बंद करावी, बिंबलवाडा, केळबायठाणे येथील घरांना पाणी पुरवठा करण्यात यावा, भाडेकरुंची घरमालकांकडून सक्तीने माहिती पंचायतीमध्ये जमा करावी, बेतोडा औद्योगकि वसाहतीमध्ये स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, बेतोडा-बोरी बगल मार्गावर पार्क केल्या जाणाऱया अवजड वाहनांवर कारवाई करावी, पंचायत क्षेत्रात अनेक ठिकाणी सणासुदीच्या दिवसात उभारले जाणारे शुभेच्छा फलक व आस्थापनांच्या जाहिरातींना परवाना नसल्यास कारवाई करावी. निरंकाल भागात प्रवासी बस वाहतुकी अभावी नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी व नियमित कदंब बससेवा सुरु करावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या.
भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून ती अपघातास कारणीभूत ठरत आहेत. त्यांचा बंदोबस्त करावा, निरंकाल ते बेतोडा दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण, निरंकाल येथील नियोजित बालोद्यानाच्या कामाला चालना द्यावी, अंतगंत रस्त्यावर दिशादर्शक फलक उभारणे, उघडय़ावर कचरा फेकणाऱयांवर कारवाई करणे, औद्योगकि वसाहतीमधील काही आस्थापनामधून दुषीत पाणी नाल्यात सोडले जात असून त्यावर कारवाई करावी. पंचायतक्षेत्रात रुग्णवाहिका उपलब्ध करुन द्यावी या अन्य मागण्यांवरही चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. सभेत विविध समित्यांची निवड करण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेत हेमंत सामंत, बाबुसो गावकर, सदानंद बोणबागकर, प्रज्योत गावकर, राजेंद्र सालेलकर, देवेंद्र च्यारी, संदेश च्यारी, जितेंद्र गावकर, नेहा वेळीप व इतरांनी भाग घेतला. सचिव विनोद शेटकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम केले. उपसरपंच चित्रा सालेलकर, पंचसदस्य चंद्रकांत सामंत, विद्या गावकर, मधू खांडेपारकर, वैशाली सालेलकर, प्रशांत गावकर, दिनेश गावकर, अक्षय गावकर व गीता गावडे हे उपस्थित होते.