प्रतिनिधी / करमाळा
खडकी तालुका करमाळा येथे चारित्र्याच्या संशायवरुन राहत्या घरामध्ये डोक्यात दगडी पाटा घालून पत्नीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये संशयित पत्नीविरुद्ध ३०२ प्रमाणे पोलिसात आज सायं गुन्हा दाखल झाला. संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सुदाम शामराव गायकवाड (वय 52, रा. खडकी, ता. करमाळा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून खून झालेल्या व्यक्तीचा भाऊ रावसाहेब शामराव गायकवाड (वय 42, रा. खडकी, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, ‘मोठा भाऊ सुदाम शामराव गायकवाड व त्याची पत्नी सुनिता व तिने मुले गावामध्ये राहत आहेत. सुदामची मुले मोलमजूरीसाठी बाहेरगावी आहेत. तर मोठा भाऊ व त्याची पत्नी हे दोघेच घरात राहत होते. सुदामची पत्नी नेहमी त्याच्यावर संशय घ्यायची. त्यामुळे दोघामध्ये भांडणे व्हायची. रविवारी (ता. 21) सकाळी 8 वाजताच्या सुमारास वस्तीवर घरी होता. तेव्हा मोठ्या भावाच्या घरी काय तरी झाल्याचे समजले. त्यानंतर तेथे गेलो तेव्हा भाचा राजकुमार भरत ठाकर (रा. देऊळगाव, ता. परांडा, जि. उस्मानाबाद) याने सांगितले की, मामा सुदामच्या मुलाचा (राम) फोन आला होता. तेव्हा सुदामच्या पत्नीने तोंडावर दगडी पाटा मारला.
त्यानंतर सुदाम रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याच्या तोंडावर गंभीर दुखापत झालेली दिसली. घराचा समोरील बाजूचा आतमधून दरवाजा बंद तर मागील दरवाज्यास बाहेरुन कुलूप होते. त्याला रुग्णवाहिकेतून करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तेव्हा डॉक्टरांनी उपचारापुर्वीच मृत घोषित केले. त्यानंतर सुदामच्या पत्नीला विचारले तेव्हा ‘मीच दगडी पाटा तोंडावर मारुन त्यास जिवे ठार मारल्याचे सांगितले. असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ‘तिने असे का केले याबाबत विचारले तेव्हा ती गप्प राहिली’ असेही फिर्यादीत म्हटले आहे. करमाळा तालुक्यात याच महिन्यात झालेला हा दुसरा खून आहे. भिलारवाडी येथील खुनानंतर हा दुसरा खून झाला आहे.









