दिघंची / वार्ताहर
खटाव-माण साखर कारखान्याने 15 डिसेंबर अखेरपर्यंतच्या ऊस बिलाचा प्रथम हप्ता 2400 रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान असल्याचे मत पुजारवाडी (दि) चे ब्रह्मदेव होनमाने यांनी व्यक्त केले.
ब्रह्मदेव होनमाने यांनी सांगितले की कारखान्याचे चेअरमन प्रभाकर घार्गे, व्हाईस चेअरमन मनोज घोरपडे तसेच कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली खटाव माण तालुका साखर कारखान्याने शेतकऱ्यांना यंदा ऊसाला चांगला दर दिला आहे.
आतापर्यंत कारखान्याने एक लाख 35 हजार मेट्रिक टन एवढे विक्रमी उसाचे गाळप केले आहे. तसेच मोळी पूजनावेळी शेतकऱ्यांना 2400 रुपयेचा पहिला हपता देऊ, हा दिलेला शब्द कारखाना प्रशासनाने पाळला असून शेतकऱ्यांच्या खात्यावर 2400 रुपये प्रमाणे पहिला हपता जमा झाला असल्याचे होनमाने यांनी सांगितले. तसेच उर्वरित रक्कम जिल्ह्यातील इतर कारखान्याच्या दराप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे कारखाना प्रशासनाने सांगितले आहे.