प्रतिनिधी / सांगली
पलूस तालुक्यातील खटाव येथील माजी सरपंच आनंदराव धोंडीराम पाटील (वय 53) यांच्या डोक्यात कोयता घालून निर्घृण खून करण्यात आला आहे. ही घटना रविवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास खटाव, नांद्रे, वसगडे या बदकी रस्त्यावर झाली. दोघा हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत पाटील यांच्यावर हल्ला केला. शेजारचे लोक त्याठिकाणी पळत आल्यानंतर या हल्लेखोरांनी पलायन केले. हा खून सुपारी देऊन करण्यात आला असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती.
आनंदराव पाटील हे माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांचे कट्टर समर्थक होते. आर.आर.पाटील यांच्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी व नंतर भाजपाचे काम सुरू ठेवले होते. त्यांच्याविरोधात यापूर्वी तीन ते चार गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या खूनप्रकरणी नेमके कोणते कारण आहे याचा तपास पोलिसांच्याकडून सुरू करण्यात आला आहे. खून झाल्यानंतर तातडीने अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी घटनास्थळांची पाहणी केली. पोलिसांना तपासासंदर्भात सूचना दिल्या.
आनंदराव पाटील हे रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे शेताकडे फेरी मारण्यासाठी दहा साडेअकराच्या सुमारास गेले होते. त्यांची दाक्षबाग तसेच इतर सर्व शेती ही खटाव, नांद्रे, वसगडे या बदकी रस्त्यावर आहे. मोटारसायकलवरून ते त्याठिकाणी जात होते. त्यावेळी पाठीमागून एका मोटारसायकलीवरून दोघे हल्लेखोर तोंडाला रूमाल बांधून आले आणि त्यांनी त्यांच्या गाडीच्या आडवी गाडी मारली. त्यामुळे पाटील हे थांबले. पाटील यांना काही समजण्याच्या आधीच या हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात कोयत्यांने वार केला. हा वार इतका गंभीर होता की त्यांचा लहान मेंदूला तो लागला आणि त्यातच ते जोरात ओरडत खाली कोसळले. त्यावेळी हल्लेखोरांनी दुसरा वार केला. पण तो त्यांच्या हातावर बसला. तोपर्यत पाटील का ओरडत आहेत म्हणून आजूबाजूच्या शेतातील शेतमजूर पळत येऊ लागले. हे शेतमजूर पळत येत असल्याचे पाहताक्षणी हल्लेखोरांनी त्याठिकाणाहून पळ काढला.
वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयात आणले
आनंदराव पाटील यांची स्थिती गंभीर होती. या शेतमजुरांनी तातडीने पाटील यांच्या कुटुंबीयांनी माहिती दिली व गंभीर अवस्थेत पाटील यांना वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयात दाखल केले. त्यावेळी त्यांची स्थिती गंभीर बनली होती. त्यांना तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू करण्यात आले. पण काळीवेळातच त्यांची प्राणज्योत मालविली. पाटील यांचा खून झाल्याची माहिती खटाव परिसरात समजताच त्याठिकाणच्या नागरिकांनी आणि भाजपा व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सिव्हिल परिसरात मोठय़ाप्रमाणात गर्दी केली होती. पाटील यांचा मृत्यू झाल्याचे समजताच त्यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.
इन कॅमेरा शवविच्छेदनाची मागणी
दरम्यान, आनंदराव पाटील यांच्या मृतदेहाची इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात यावे अशी मागणी त्यांचे मोठे बंधू संजय पाटील यांनी सिव्हिल प्रशासनाकडे केली. पण इन कॅमेरा शवविच्छेदनाची सोय सांगलीत नाही. इन कॅमेरा शवविच्छेदनाची सोय ही फक्त मिरजमध्ये असल्याने शवविच्छेदन थांबविण्यात आले होते.
प्रतिष्ठीत कुटुंब
मयत आनंदराव पाटील हे सलग दहा वर्षे सरपंच होते. तसेच विविध सहकारी संस्थेचे ते सभासद होते. गृहमंत्री आर.आर.पाटील यांचे ते समर्थक होते. याशिवाय त्यांचे लहान बंधू गजानन पाटील हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे स्वीय सहाय्यक आहेत. तर एक बंधूंची सांगलीत एमआयडीसीमध्ये वर्कशॉप आहे. तर दुसरे बंधू हे शेती करतात. पाटील यांच्या एका मुलांचे बारामतीमध्ये वर्कशॉप आहे. तर एक मुलगा त्यांची शेती पाहत आहे. तर मुलगी स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाली आहे.
खुनाच्या कारणाबाबत तर्कविर्तक
आनंदराव पाटील हे राजकीय व्यक्ती असल्याने त्यांचे अनेक राजकीय विरोधक आहेत. तसेच काही दिवसापूर्वी त्यांची द्राक्षबागेत कोणी तरी आग लावली होती. याशिवाय पाटील यांच्यावर तीन ते चार गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे नेमके कोणत्या कारणातून त्यांचा खून करण्यात आला आहे. या बाबत मात्र पोलीसही चक्रावले आहेत. त्यांनी तातडीने खटावमधील काही जणांना चौकशीसाठी ताब्यातही घेतले आहे.
घटनाक्रम
सकाळी 11.30 पाटील शेताकडे रवाना
12.00 सुमारास हल्लेखोरांकडून हल्ला
01.15 जखमी अवस्थेत वसंतदादा रूग्णालयात दाखल
01.30 पाटील समर्थकांची रूग्णालयात गर्दी
03.30 सुमारास रूग्णालयांकडून मृत घोषित
तपासासंदर्भात सूचना : मनिषा दुबुले
घटनास्थळांची पाहणी केल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले यांनी तातडीने स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला व पलूस आणि भिलवडी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱयांना तातडीने तपास करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.








