मतदारसंघ रचनेत दोन गट, चार गण वाढणार : नव्या रचनेमुळे तालुका ढवळून निघणार
फिरोज मुलाणी / औंध :
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारुप आराखडय़ावर आता पारावर चर्चा रंगू लागली आहे. गट रचनेनुसार खटाव तालुक्यात नवीन दोन जिल्हा परिषद गट आणि चार पंचायत समिती गण वाढणार आहेत. अनेकांना नवीन गट आणि गण रचनेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
पूर्वी खटाव तालुक्यात सात जिल्हा परिषद गट तर चौदा पंचायत समिती गण होते. त्यामध्ये बुध, खटाव, औंध, वडूज, पुसेसावळी, मायणी, कलेढोण या गटांचा समावेश होता. 2017साली जिल्हा परिषद गटांची पुनर्रचना झाली. वडूज नगरपंचायतीच्या निर्मितीनंतर एक गट कमी होऊन सातचे सहा गट झाले. त्यामध्ये पूर्वीचे बुध, कलेढोण हे दोन गट कमी झाले. बुधचा समावेश नवीन पुसेगांव गटात झाला. आता वाढीव लोकसंख्येच्या निकषानुसार आणखी दोन जिल्हा परिषद गट वाढणार असल्याने आठ गट व सोळा गण तयार करून प्रारुप आराखडा तयार करण्यात आला आहे. मतदारसंघाच्या नवीन रचनेनुसार सिध्देश्वर कुरोली गट, किंवा पूर्वी प्रमाणे बुध गट अथवा कलेढोण गटाची निर्मिती होण्याची चर्चा सध्या सुरू आहे. दोन गट वाढल्याने चार पंचायत समिती गण देखील वाढणार आहेत. सध्या नवीन गटरचनेसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारुप आराखडय़ावर सर्वत्र चर्चा झडत आहेत.
तालुक्यात वाढणाऱ्या दोन जिल्हा परिषद गट मतदारसंघासाठी पूर्वीच्या गटातील गावे फोडली जाण्याची शक्यता आहे. प्रशासनाला दोन नवीन गट आणि चार पंचायत समिती गणाची निर्मिती करताना गावांची नव्याने तोडफोड करावी लागणार आहे. त्यामुळे काही सदस्यांना प्राबल्य असलेल्या गावावर पाणी सोडावे लागणार आहे. तर काही सदस्यांना त्रासदायक ठरणारी गावे आपसुक दुसऱया गटात गेल्याचे समाधान मिळणार आहे. नवीन रचनेनुसार काही गट आणि गणांचा विचका होणार आहे. त्यासाठी काही राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप केला असल्याची चर्चा आहे. नेत्यांनी केलेली ढवळाढवळ काही जणांच्या पथ्यावर पडणार असली तरी काहीच्या मुळावर उठू शकते.
नवीन गटरचनेनुसार प्रारुप आराखडे जाहीर झाल्यानंतर हरकती मागवून मतदारसंघावर शिक्कामोर्तब केले जाईल. नवीन गटाची रचना आणि समाविष्ट गावे याचा अंदाज घेऊन इच्छुकांना निवडणूक मोर्चेबांधणी करण्यासाठी कंबर कसावी लागेल. पूर्वी तयारी केली असली तरी आता नवीन गटरचना डोळ्यासमोर ठेवून काम करावे लागणार आहे. कोरोना काळात निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेकांनी काम केले असले तरी गट रचना बललणार असल्याने तालुक्यातील राजकीय नेतेमंडळीत सध्या तरी कुणाला खुशी कुणाला गम असेच वातावरण आहे. सर्वांचे डोळे नवीन प्रारुप आराखडय़ाकडे लागले आहेत.
अनेकांना उकळ्या
प्रारुप आराखडय़ात जिल्हा परिषद गटाची रचना सोईस्कर झाल्यामुळे अनेकांना आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या आहेत. गटरचना सोईची झाली तरी आरक्षणाचा अडथळा अद्याप दूर झालेला नाही. त्यामुळे आरक्षण निश्चित करताना भाग्यपत्रिकेचा ड्राँ कसा निघतोय यावरच अनेकांचे नशीब अवलंबून असणार आहे.
राजकीय वापर करून सोईच्या गटरचनेचा प्रयत्न
जिल्हा परिषदेच्या नवीन मतदारसंघाचा प्रारूप आराखडा जाहीर झाल्यानंतर त्यावर हरकती मागवल्या जातील. निवडणूक आयोगाकडे हरकती दाखल झाल्यानंतर त्यामध्ये बदल करण्यात येतो. परंतु पूर्वानुभव लक्षात घेता हरकतीचा काही उपयोग होत नसल्याची राजकीय क्षेत्रात चर्चा आहे. तर राजकीय प्रभावाचा वापर करून सोईची गटरचना करण्यासाठी काहीजण प्रयत्न करतात . प्रारुप म्हणून सादर केलेला आराखडा कायम होईल का त्यामध्ये काही बदल होणार हे लवकरच स्पष्ट होईल.









