प्रतिनिधी / सातारा :
केंद्र शासनाच्या ‘सर्वांसाठी घरे’ या योजनेनुसार सातारा जिल्ह्यात ज्यांना घर नाही, अशा लोकांना घर देण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या विभागाकडून प्रयत्न सुरु होता. त्यानुसार फलटण तालुक्यातील खटकेवस्ती येथे शासकीय जागेत 75 लाभार्थ्यांना घरे बांधून देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळणार आहे. त्यामध्ये रमाई आवासचे 28 तर प्रधानमंत्री आवास योजनेचे 44 आणि शबरी आवास योजनेचे 3 असे 75 लाभार्थ्यांना 500 चौरस फुटाचे घर बांधण्यासाठी हस्तांतरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
पिढय़ान पिढय़ा अठरा विश्व दारिद्रय़, आता कशी पोटाची भूक भागवायची यासाठी झगडणाऱ्यांचे जीवन कुठे झोपडीत तर कुठे खापटात असते. अशांना स्वतःचे हक्काचे घर असावे याकरता केंद्र शासनाने घरकुल योजना सुरु केली. त्याच योजनेची प्रभावी अंमलबजावणी सातारा जिल्ह्यात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने कार्यवाही सुरु झाली. अशा लोकांचा सर्व्हे करुन त्यांना घर कसे मिळेल यासाठी आलेल्या प्रस्तावानुसार मान्यता देण्यापासून कार्यवाही सुरु झाली. फलटण तालुक्यातील खटकेवस्ती येथील ग्रामपंचायतीमध्ये गट नं. 203 व 241 मधील 11088 हेक्टर चौरस मीटर जागेपैकी 3485.12 चौरस मीटर जागा ग्रामीण भागातील केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांच्या भूमिहिन लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गंत व रमाई व शबरी आवास योजनेतंर्गत निवासी घरकुल बांधकाम करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. 75 लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर झाले असून त्यांना निधीही घर बांधण्यासाठी मंजूर करण्यात आला असून त्यानुसार जागेचा प्रश्न होता तोही आता निकाली निघाला आहे. त्यामुळे लवकरच तेथे 75 जणांचे घरकुल उभे राहणार आहे.









