तलवारीच्या वाहतुकीसाठी मोटारसायकलमध्ये फेरफार
प्रतिनिधी/ बेळगाव
चार दिवसांपूर्वी सिव्हिल हॉस्पिटलमधील रखवालदार (सिक्युरिटी गार्ड) महिलेचा भीषण खून करण्यात आला होता. एपीएमसी पोलिसांनी या प्रकरणी बैलहोंगल येथील तरुणाला अटक केली असून या तरुणाने खुनासाठी तलवार कोठून आणली याची चौकशी करण्यात येत आहे.
सुधाराणी बसवराज हडपद (वय 29) मूळची राहणार मुगबसव, सध्या रा. कंग्राळी खुर्द या महिलेचा 30 डिसेंबर रोजी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात तलवारीने सपासप वार करून खून करण्यात आला होता. इराण्णा जगजंपी (वय 22) रा. बैलहोंगल या तिच्या प्रियकराला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱयांनी इराण्णाला अटक करून त्याने खुनासाठी वापरलेली तलवार जप्त केली आहे. ही तलवार अत्यंत धारदार असून इराण्णाने ती कोठून आणली? याची अधिकाऱयांनी चौकशी केली आहे. बैलहोंगलच्या डोंगरावर ही तलवार आपल्याला मिळाली होती. कोणीतरी ती टाकून गेली होती. ती आपण घरात आणून ठेवल्याची कबुली इराण्णाने दिली आहे.
डोंगरावरून घरी आणल्यानंतर दरवषी खंडेनवमी दिवशी इतर शस्त्रs व अवजारांबरोबर या तलवारीची पूजा करण्यात येत होती. सुधाराणीचा खून करण्यासाठी इराण्णाने ही तलवार आपल्या मोटारसायकलच्या सीटखाली लपवून आणली होती. त्यासाठी मोटारसायकलमध्ये आवश्यक बदलही करून घेतले होते, अशी माहिती उघडकीस आली आहे.
ही तलवार अडीच फुटाहून अधिक लांबीची आहे. तिला धारही चांगली आहे. मोटारसायकलवरून उतरून सुधाराणीबरोबर चर्चा करता करता इराण्णाने सीटखाली ठेवलेली तलवार बाहेर काढून तिच्यावर सपासप वार केल्याचे उघडकीस आले आहे. दसऱयात तलवारीची पूजा केल्यानंतर या माथेफिरूने आपल्या प्रेयसीच्या हत्येसाठी त्या तलवारीचा वापर केला आहे.