प्रतिनिधी / ओटवणे:
ओटवणे गावात गेल्या पंधरा दिवसापासून होत असलेल्या खंडित वीज पुरवठय़ाबाबत संतप्त ग्रामस्थांनी सावंतवाडी वीज कार्यालयाला धडक देऊन उपअभियंता एस. एस. भुरे यांना जाब विचारला. सातत्याने होत असलेल्या खंडित वीज पुरवठय़ाबाबत भुरे यांना धारेवर धरीत त्यांच्यासमोर समस्यांचा अक्षरश: पाढाच वाचला.
खंडित वीज पुरवठय़ामुळे ओटवणेवासीय गेले पंधरा दिवस हैराण झाले आहेत. या बाबत वीज वितरण कंपनीचे अनेकवेळा लक्ष वेधूनही ठोस कार्यवाही होत नसल्याने ग्राहकांमध्ये वीज वितरण कंपनीच्या कारभाराबाबत नाराजी आहे. वीज वितरण कंपनीने पावसाळय़ातील संभाव्य धोके शोधून त्याबाबत पावसापूर्वी उपाययोजना न केल्यामुळेच वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली.
यावेळी ओटवणे ग्रामस्थांनी विलवडे ते ओटवणे या वीजवाहिनीतील दोष शोधून तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली. गेले दोन वर्ष प्रलंबित असलेल्या चराठा-ओटवणे नवीन वीजवाहिनीबाबत त्वरित कार्यवाही करून ओटवणे गावातील विजेचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली.
यावेळी भुरे यांनी इन्सुली वीज उपकेंद्राच्या विलवडे येथून थेट ओटवणे गावाला सुरळीत वीजपुरवठा करण्याची ग्वाही दिली. तसेच माजगाव वीज उपकेंद्रातून नवीन वीज वाहिनी टाकण्याबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांचे समाधान झाले. यावेळी माजी सरपंच रवींद्र म्हापसेकर, संतोष भैरवकर, सगुण गावकर, संतोष तावडे, स्वप्निल उपरकर, दीपक गावकर, प्रमोद केळुसकर, आनंद गावकर, हनुमंत तावडे, अनंत तावडे, स्वप्निल म्हापसेकर, संतोष सावंत, श्रीधर गावकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.









