प्रतिनिधी / सातारा :
गेली अनेक वर्षे जवळपास 10 ते 12 वर्षे महावितरण कंपनीने शेतीपंपाची कसलीही बिले शेतकऱ्यांना दिली नाहीत व कोरोना महामारीत गैरफायदा घेत अनेक पटीने दरवाढ करत कंपनीच्या कर्मचाऱ्यांना वसुली एजंट म्हणून लाईनमनपासुन वरिष्ट आधिकाऱ्यांना 2 ते 20 टक्के कमिशन देण्याची योजना तयार केल्यामुळे थकित, बोगस, खोटी शेतीपंपाची विज बिले वसुली मोहीम चालु केली आहे. त्यामुळे हा मनमानीपणा त्वरित थांबवावा व खंडीत करण्यात आलेला विद्युत पुरवठा त्वरित सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नुकतीच निवेदनाद्वारे महावितरण कार्यालयाचे कार्यकारी अभियंते व जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याप्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या गोंडस नावाखाली व वजनदार मंत्र्यांच्या शिफारशीने पोलीस दलाचा सुध्दा वापर या बोगस वसुलीसाठी केला जात आहे, तो थांबवावा. कारण ही कंपनी आता खासगी आहे तरीही बोगस वसुलीला विरोध करणाऱ्या ग्राहक, संघटना विविध पक्ष यांच्यावर सरकारी कामात अडथळा अशा केसेस केल्या आहेत. यासह अनेक बाबतीत सामान्य ग्राहकांची लुट चालू आहे ती थांबवून न्याय मिळावा. देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली जाणिवपूर्वक तांत्रिक बिघाड करुन ग्राहकांना दुरुस्तीचे पैसे गोळा करायला लाऊन सुध्दा आर्थिक लुट केली आहे. येत्या आठ दिवसात याबाबत योग्यती कारवाई न झाल्यास सातारा जिह्यात सर्व अन्यायग्रस्त शेतकऱयांना बरोबर घेऊन ठिकठिकाणी मोर्चे काढुन न्याय मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन केले जाईल व यांची सुरुवात दि. 28 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता नागठाणे येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा व ठिय्या आंदोलन करुन करण्यात येईल व होणाऱया परिस्थितीस प्रशासन व शासन जबाबदार राहील, असेही या निवेदनाअंतर्गत यावेळी सांगण्यात आले.









