प्रतिनिधी / खंडाळा
शिक्षण विभागाचे कार्य कौतुकास्पद असून 'शाळा बंद,पण शिक्षण सुरु' या उपक्रमाअंतर्गत तालुक्यातील 85 % विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन शिक्षण पोहोचले, तर ऑफलाईन शिक्षण उर्वरित मुलांना देण्याचा प्राथमिक शिक्षक प्रयत्न करत असल्याचे सध्याचे चित्र समाधानकारक आहे. दरम्यान यावर्षी इयत्ता पाचवी व आठवीचे शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी संख्येत वाढ करण्याचे शिक्षकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन तालुका पंचायत समितीचे सभापती राजेंद्र तांबे यांनी केले.
तालुका गुणवत्ता विकास कक्षाची झुम अॅपद्वारे बैठक पार पडली. त्यावेळी सभापती तांबे बोलत होते. यावेळी प्रत्येक क्षमतेचे ज्ञान शिक्षकांनी मुलांना देणे गरजेचे आहे.तरच येणाऱ्या परिक्षेला विद्यार्थी सामोरे जातील अशी अपेक्षा गटशिक्षणाधिकारी गजानन आडे यांनी व्यक्त केली.याप्रसंगी तंञस्नेही शिक्षक पोपट कासुर्डे, संतोष नेवसे,विद्या माळी,पकंज रासकर, शुभांगी गायकवाड , शरद नेवसे,महेश खेडकर व धनजंय जाधव या शिक्षकांनी पी.पी.टी.द्वारे आढावा सादर केला.यामध्ये ऑनलाइन व आॕफलाईन शिक्षण, वयोगटाप्रमाणे उपक्रम, टीली- मीली कार्यक्रमाचे प्रक्षेपण, प्रत्यक्ष भेटी,शिक्षकांनी तपासलेले स्वाध्या, पालकांचे ऑनलाइन शिक्षणाबद्दलची मत अशा प्रकारे तालुक्यातील शिक्षकांच्या प्रयत्नाबद्दल डायटचे प्राचार्य डॉ.रामचंद्र कोरडे यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी केंद्रप्रमुख शांता भोसले,विषय तज्ञ दास लोखंडे व उज्वला जगताप यांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी स्वागत व प्रस्ताविक केंद्रप्रमुख सुदंर बिचुकले यांनी केले व आभार जगताप यांनी मानले.
यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.रामचंद्र कोरडे,गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले,गटशिक्षणाधिकारी गजानन आडे,ज्ञानप्रकाश फाऊंडेशनचे प्रशांत भोसले,केंद्रप्रमुख सुंदर बिचकुले, शांता भोसले,सर्व विषय तज्ञ,तंत्रस्नेही शिक्षक या बैठकीला उपस्थित होते.









