जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमधील ‘टीम 25’ चा कोरोनाविरोधातील लढा : एकमेव ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण निगेटिव्ह झाल्यानंतरच आनंद अवर्णनीय!
संदीप गावडे / सिंधुदुर्गनगरी:
‘कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूला रोखण्यासाठी कोरोना बाधित किंवा संशयित रुग्णांवर उपचार करताना आपल्याला कोरोनाची लागण तर होणार नाही ना..! अशी धाकधूक मनात होतीच. परंतु, आपण आरोग्य सेवेत काम करताना प्रथम कर्तव्य निभावले पाहिजे, ही भावना कायम ठेवली अन् मन खंबीर करून कोरोना बाधित रुग्णाला कोरोनामुक्त करण्याचं काम यशस्वीपणे पार पाडले. हा आनंद गगनात मावेनासा असाच होता’ ही प्रतिक्रिया आहे जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये काम करणाऱया 25 जणांच्या टीमची. अर्थातच त्यांचे हे कार्य सलाम करावा, असेच.
कोरोनाचा प्रवेश महाराष्ट्रात झाल्यावर सर्व आरोग्य यंत्रणा सतर्क होत कामाला लागली. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयानेही तयारी केली. कोरोनाचे संशयित रुग्ण व कोरोना बाधित रुग्णांसाठी आयसोलेशन वॉर्ड तयार केला व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील व डॉ. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 25 जणांची टीम तयार केली. यामध्ये डॉक्टर, नर्स, समुपदेशक, वॉर्डबॉय यांचा समावेश करून टीम कामाला लागली. गेल्या वीस दिवसांपासून ही टीम आयसोलेशन वॉर्डमध्ये दिवस रात्र कार्यरत आहे. थोडय़ाफार प्रमाणात डय़ुटी बदलली जाते. परंतु या 25 जणांच्या टीमद्वारे प्रत्येक रुग्णांवर उपचार केले जात आहे.
कर्तव्य आठवले, अन्…
जिल्हय़ात आढळलेला कोरोना बाधित रुग्ण कोरोना मुक्त झाल्यावर डॉ. चाकुरकर व 25 जणांच्या टीमच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता, त्यांनी पुढे सांगितले की, ‘कोरोना रोखण्यासाठी जिल्हा रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड तयार करून त्यामध्ये आपल्या डय़ुटी लागताच मनात थोडीशी भीती निर्माण झाली खरी. कोरोना बाधित रुग्ण व संशयित रुग्णांवर उपचार करता-करता आपल्यालाच कोरोना झाला तर..! असे अनेक प्रश्न मनात येऊ लागले. इतरांप्रमाणे आपलेही कुटुंब आहे. कुटुंबाचं काय होईल, अशी धाकधूकही सुरू झाली. परंतु, दुसरीकडे आम्हाला आमच्या कर्तव्याचीही जाणीव होती. आरोग्य यंत्रणेत काम करताना कर्तव्य बजावणे फार महत्वाचे आहे. आपल्यामुळे रुग्ण बरे होत असतील, आपल्यामुळे कुणाला तरी जीवदान मिळत असेल, तर कर्तव्य बजावण्यास प्राधान्य दिले पाहिजे. आणि याच कर्तव्य भावनेतून आयसोलेशन वॉर्डमध्ये काम सुरू केले.’
कुटुंबापासून दूर राहावे लागले, पण..
आयसोलेशन वॉर्डमध्ये काम करीत असताना संशयित रुग्ण केव्हाही आणले जात होते. त्यामुळे काहीवेळा घरीही जात येत नव्हते. घरी गेल्यास निर्जंतुकीकरण करूनच घरात जावे लागते. लहान मुलाला जवळ घेण्याची इच्छा असूनही दूर ठेवावे लागते. एवढी वर्षे आरोग्य सेवा देत असताना अगदी बिनधास्तपणे काम करीत होतो. परंतु कोरोनाच्या संकटात मात्र रुग्णांची आणि स्वत:चीही काळजी घ्यावी लागते. कोव्हीड-19 चा कीट, मास्क घातल्याशिवाय प्रवेशच नाही. किट घालूनच आयसोलेशन वॉर्डमध्ये जावे लागते. रेल्वेतून प्रवास करून आलेला रुग्ण पॉझिटिव्ह आल्याचे कळताच सर्वांच्याच मनात धस्स झाले. परंतु, लगेचच प्रत्येकाने स्वत:ला सावरले. वरिष्ठांनीही कर्तव्याची जाणीव करून दिली. त्यामुळे पॉझिटिव्ह आलेला रुग्ण कसा बरा होईल, याकडे लक्ष केंद्रीत केले.
कोरोनाबाधित रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी परतला असला, तरी आपले काम आता संपलेले नाही. संपूर्ण भारतातून कोरोनाचे संकट परतवून लावेपर्यंत कोरोनामुक्तीचे काम सुरूच राहणार आहे. आयसोलेशन वॉर्डमध्ये अजूनही काही रुग्ण उपचार होत आहेत. त्यांच्यावरही योग्य प्रकारे उपचार केले जाणार आहे. कोरोनाविरुद्धचा लढा सुरुच राहणार, असा निर्धार व्यक्त करीत शेवटी कर्तव्याला महत्व असून मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे, अशा शब्दात यावेळी भावना व्यक्त करण्यात आल्या.
कर्तव्याला महत्व, चीज झाल्याचा आनंद
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला वेळच्यावेळी औषधोपचार केले जात होते. त्याच्या खाण्यापिण्याचीही व्यवस्था बघितली जात होती. त्याहून महत्वाचे म्हणजे त्या रुग्णाला समुपदेशकामार्फत त्याचे समुपदेशन करून धीर दिला व कोरोनाला न घाबरता प्रतिकार करण्यासाठी मनोबल वाढवले. त्यामुळे तो रुग्ण न घाबरता औषधोपचाराला प्रतिसाद देत होता. तसेच कोरोनाची लागण झाल्यामुळे आपल्याला एकटे टाकले, अशी एकटेपणाही त्याला जाणवू दिला नाही. औषधोपचाराबरोबरच त्याच्याशी अधूनमधून संवाद सुरूच होता. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा 14 दिवसांनंतर ज्यावेळी निगेटिव्ह नमुना आला, त्यावेळी सर्वांनाच आनंद झाला. त्याचा तिसरा नमुनाही निगेटिव्ह आला. त्यानंतर चार दिवस देखरेखिखाली ठेवून अखेर गुरुवारी त्या कोरोनामुक्त रुग्णाला डिस्चार्ज दिला गेला. ज्यावेळी तो रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतला, त्यावेळी डॉक्टरांसह सर्व टीमला झालेला आनंद अवर्णनीय असाच होता. आपण जे कर्तव्याला महत्व दिले, त्याचे खऱया अर्थाने चीज झाल्याचा आनंद त्यावेळी झाला, अशीही प्रतिक्रिया यावेळी नोंदविण्यात आली.









