पणजी :
राज्य सरकारतर्फे सुरू करण्यात आलेली क्वॉरंटाईन सुविधा म्हणजे एक मोठा घोटाळा आहे. या सुविधेसाठी गोमंतकीयांची महालूट होत आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाकडे या घोटाळय़ाबाबत सर्व पुरावे असून हे पुरावे आहेत. सरकारने या घोटाळय़ाची चौकशी करावी आणि घोटाळय़ात हात असलेल्या उत्तर गोवा व दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व इतरांवर कारवाई करावी, अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाने केली आहे.
गोवा फॉरवर्ड पक्षाचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी काल गुरुवारी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली.
हॉटेल्समधून तब्बल तिपटीने भाडे आकारणी
क्वॉरंटाईन सुविधेसाठी विदेशांतून तसेच राज्यातून येणाऱया गोमंतकीयांकडून तसेच इतर लोकांकडून पैसे घेतले जात आहेत. ही सुविधा देण्यात आलेल्या हॉटेलमध्ये रोजच्यापेक्षा जास्त भाडे आकारून गोमंतकीयांची लूटमार केली जात आहे. जे हॉटेलवाले पर्यटन हंगामात कमी भाडे घेऊन पर्यटकांना राहण्याची सुविधा देत होते तेच आता क्वारंटाईन होणाऱया गोमंतकीयांकडून तिप्पटीने भाडे उकळत आहेत, असा दावा कामत यांनी केला आहे.
विधानसभेतही प्रश्नाला उत्तर मिळाले नाही
विधानसभा अधिवेशनावेळी विरोधकांनी क्वॉरंटाईन सुविधेबद्दल माहितीचा प्रश्न उपस्थित केला होता. परंतु हा प्रश्न अधिवेशनात घेण्यात आला नाही. त्या प्रश्नाचे उत्तर सरकारकडून मिळाले नाही असे कामत यांनी सांगितले.
कोरोनाच्या महामारीत सरकार गिधाडासारखे वागते
गोवा सरकार कोरोनाच्या महामारीत गिधाडासारखे वागत आहे. लवकरच या घोटाळय़ाचा खुलासा होईल. या घोटाळय़ाबाबत गोवा फॉरवर्ड पक्षाकडे सर्व पुरावे असून या पुराव्यांची शहानिशा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या प्रकरणात लोकायुक्ताने लक्ष घालावे व चौकशी करावी अशी मागणी दुर्गादास कामत यांनी यावेळी केली.
क्वॉरंटाईन होणाऱयांकडून उकळले जातायत हजारो रुपये
विदेशांतून येणारे गोमंतकीय खलाशी व इतरांना संस्थात्मक क्वॉरंटाईन करण्यासाठी ठराविक हॉटेलमध्येच क्वारंटाईन करण्याची सक्ती केली जात आहे. एरव्ही प्रतिदिन 700 ते 800 रूपयांत मिळणारी खोली सध्या प्रतिदिन 2500 ते 3000 रूपयांत भाडय़ाने दिली जात आहे. मडगाव सारख्या शहरात पर्यटन हंगामातही प्रतिदिन 700 रूपयात मिळणारी खोली आता तब्बल 3000 रूपयात भाडय़ाने दिली जात आहे. अशा प्रकारे मोठय़ा प्रमाणात कमिशन उकळून लूटमार केली जात असल्याचा दावा दुर्गादास कामत यांनी केला आहे.









