वांग यी यांना पदावरून हटविण्याचा जिनपिंग यांचा निर्णय
वृत्तसंस्था / बीजिंग
चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल केला आहे. जिनपिंग यांनी 10 वर्षांपर्यंत विदेशमंत्री राहिलेल्या वांग यी यांना या पदावरून हटविले आहे. यी यांच्या जागी आता क्विन गेंग यांना नवे विदेशमंत्री करण्यात आले आहे. गेंग हे सध्या अमेरिकेत चीनचे राजदूत असून अध्यक्ष जिनपिंग यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. वांग यी यांना पदावरून का हटविण्यात आले हे अद्याप स्पष्ट नाही.
गेंग यांच्यासमोर विदेशमंत्री म्हणून अनेक आव्हाने असणार आहे. भारतासोबतच सीमा वाद, अमेरिकेसोबतचा तणाव अन् तैवानमध्ये युद्धाचा धोका अशा अत्यंत महत्त्वाच्या मुद्दय़ांना त्यांना सामोरे जावे लागणार आहे.
69 वर्षीय वांग यी हे 10 वर्षांपर्यंत चिनी विदेश मंत्रालयाचे प्रमुख राहिले. वांग यी यांना कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोमध्ये स्थान देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. चीनच्या विदेश धोरणविषयक प्रकरणांना पक्षाच्या वतीने ते हाताळू शकतात. परंतु चीनचे सरकार वांग यी यांच्या नव्या भूमिकेबद्दल मौन बाळगून आहे.
56 वर्षीय क्विन गेंग यांना चिनी विदेश मंत्रालयातील सर्वात अनुभवी अधिकाऱयांपैकी एक मानले जाते. जिनपिंग यांचे विश्वासू असल्यानेच क्विन यांना अमेरिकेत राजदूत म्हणून नियुक्ती मिळाली होती. तसेच क्विन हे 2014-18 दरम्यान जिनपिंग यांचे प्रोटोकॉल ऑफिसर म्हणून कार्यरत होते.









