वृत्तसंस्था/ टोकियो
क्वाडची पुढील वर्षी होणारी परिषद आयोजित करण्यासाठी जपान तयार असल्याचे उद्गार व्हाइट हाउसचे हिंद-प्रशांत समन्वयक कर्ट कॅम्पबेल यांनी काढले आहेत. क्वाडची ही दुसरी प्रत्यक्ष परिषद असणार आहे. क्वाड अधिकृत स्वरुपात क्वाड्रिलेटरल सिक्युरिटी डायलॉग्स आहे. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया याचे सदस्य आहेत. या देशांच्या सागरी सीमांचे हितसंबंध जपणे, हवामान बदल, कोरोना महामारीच्या विरोधातील लढाई हा याचा उद्देश आहे. दक्षिण चीन समुद्रात चीनच्या वाढत्या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न या संघटनेच्या माध्यमातून केला जातोय.
2022 मध्ये क्वाडची पुढील परिषद जपानमध्ये होणार आहे. भारत क्वाडचा एक महत्त्वपूर्ण सदस्य असून अमेरिका भारतासोबत संबंध वृद्धिंगत करण्यासाठी दृढ असल्याचे कॅम्पबेल यांनी वॉशिंग्ट येथील थिंक टँक युएस इन्स्टीटय़ूट ऑफ पीसच्या एका कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे. क्वाड ही संकल्पना 2004 मध्ये हिंदी महासागरात आलेल्या त्सुनानीनंतर उदयास आली होती. तेव्हा भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेने मिळून मदत तसेच बचावकार्य केले होते. पण या मोहिमेनंतर हा गट संपविण्यात आला होता. तर 2006 मध्ये जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिंजो आबे यांनी हा गट पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला होता.









