सध्या शहर-उपनगरांतील वर्दळ बंद असल्याने अर्धवट कामे पूर्ण करण्यास पोषक वातावरण : तीन वर्षांपासून कामे सुरू असल्याने नागरिक हैराण

प्रतिनिधी / बेळगाव
शहर स्मार्ट बनविण्यासाठी विविध विकासकामे राबविण्यात येत आहेत. मात्र, सदर कामे संथगतीने सुरू असल्याने शहरवासियांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. मागील तीन वर्षांपासून ही कामे सुरू असल्याने त्यांची पूर्तता कधी होणार, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. सध्या क्लोजडाऊनमुळे रहदारी कमी असल्याने स्मार्ट सिटीची कामे पूर्ण करावीत, अशी मागणी होत
आहे.
शहरातील रस्त्यांचा विकास, स्मार्ट बसथांबे, स्मार्ट बसस्थानक, गटारींचे बांधकाम, विविध चौकांचा विकास, उद्यानांचे सुशोभिकरण अशी अनेक कामे स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात येत आहेत. शहराचा कायापालट करून स्मार्ट सिटी बनविण्याचा प्रस्ताव आहे. याअंतर्गत फूटपाथचे बांधकाम, डेकोरेटिव्ह पथदीप, सायकल ट्रक आदी सुविधाही उपलब्ध करण्यात येत आहेत. अशी असंख्य कामे शहराच्या विविध भागात करण्यात येत आहेत. मागील 3 वर्षांपासून ही कामे सुरू असून काही कामे अद्यापही अर्धवट स्थितीत आहेत. रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले असून रस्त्यांच्या दुतर्फा फूटपाथ निर्माण करण्याचे काम रखडले आहे. अशी स्थिती अनेक रस्त्यांची असून हे काम कधी पूर्ण होणार, अशी विचारणा होत आहे.
स्मार्ट सिटीच्या कामांमुळे अनेक रस्ते खोदण्यात आले आहेत. काही ठिकाणी डेनेज वाहिन्या घालण्यासाठी खोदाई करण्यात आली आहे. पावसाळय़ात शहरवासियांना कोणत्याही समस्या निर्माण होऊ नयेत, याची दक्षता घेण्याची जबाबदारी महापालिका व जिल्हा प्रशासनाची आहे. पण जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. अशातच स्मार्ट सिटी योजनेंतर्गत हाती घेण्यात आलेली कामे पावसामुळे रखडत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. यापूर्वी ठिकठिकाणी नवीन रस्ते बनविण्यासाठी रस्त्यांची खोदाई करण्यात आली होती. गटारांच्या बांधकामांसाठी चरी खोदण्यात आल्या होत्या. मात्र, पावसाळय़ापूर्वी वेळेत काम झाले नसल्याने रस्त्यांचे व गटारींचे बांधकाम रखडले होते. परिणामी शहरवासियांना चिखलमय रस्त्यांवरून ये-जा करावी लागली. काही ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने अपघाताला सामोरे जावे लागले. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या कामांची धास्ती शहरवासियांनी घेतली आहे.
मागीलवषी कोरोनाच्या प्रसारामुळे विकासकामे पूर्ण झाली नाहीत. मात्र, सध्या विविध विकासकामे सुरू असून यंदा तरी पावसाळय़ापूर्वी पूर्ण होणार का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. रस्त्यांसाठी खोदण्यात आलेले खड्डे पावसाचे पाणी भरून शहरवासियांना जीवघेणे बनत आहेत. यंदादेखील अशा खड्डेमय आणि धोकादायक रस्त्यांवरूनच ये-जा करावी लागणार का? अशी विचारणा नागरिक करीत आहेत. काही रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले पण साईडपट्टय़ांचे काम झाले नाही. विविध वाहिन्या घालण्यासाठी रस्त्यांशेजारी खोदाई करून ठेवण्यात आली आहे. पावसाळय़ापूर्वी हे खड्डे बुजणार का? असाही मुद्दा उपस्थित झाला आहे.
अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी पोषक स्थिती…
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने क्लोजडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे शहर आणि उपनगरांतील वर्दळ बंद आहे. परिणामी शहरातील रस्ते मोकळे झाले आहेत. त्यामुळे अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी पोषक परिस्थिती आहे. यावेळी बांधकाम व्यवसाय सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे कामे पूर्ण करण्यात अडचणी कमी झाल्या आहेत. क्लोजडाऊन काळात स्मार्ट सिटी व महापालिकेकडून राबविण्यात येणारी विकासकामे पूर्ण करून रस्ते व्यवस्थित करावेत, अशी मागणी होत आहे.









