अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट स्टेशन ते अक्कलकोट रोडवर पेट्रोल पंपासमोर क्लुझर वाहनाचे मागील बाजुचे टायर फुटुन समोरून येणाऱ्या मोटारसायकलला धडकल्याने मोटार सायकलवरील कर्नाटकातील मामा-भाचे यांचा जागेवरच मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला. गुरप्पा जंगप्पा ग्वलर (वय २८) रा.सालुटगी कर्नाटक व मामा जंगप्पा भिमशा सावळे वय ६० रा.आळंद जि कलबुरगी कर्नाटक असे अपघातातील मयतांचे नांव आहे. या भीषण अपघातात मोटरसायकल स्वारांच्या डोक्याला जबरदस्त मार बसल्याने जागेवरच मयत झाले. या अपघाताची दक्षिण पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात क्लुझर चालकाविरूद्ध गुन्हा दाखल झाला असुन चालक गाडी सोडुन अपघातानंतर पसार झाला.
याबाबत पोलीस सुत्राकडुन मिळालेली अधिक माहिती अशी की, मयत गुरप्पा व त्याचे आळंद येथील मामा जंगप्पा मोटारसायकल क्रमांक के ए २८ एच ए १६३४ वरून अक्कलकोट कडे येत होते. त्याच वेळेस अक्कलकोट कडुन स्टेशन कडे जाणाऱ्या क्लुझर वाहन क्रमांक के ए ४८ एम २५०८ चे समोरचे टायर फुटल्याने मोटारसायकलवर आदळले. उपचारापुर्वीच जागेवरच दोघांचेही मयत झाले. दोघेही ऊसतोड मजुरी करत होते. सिद्धाराम रमेश यारोळे रा. अक्कलकोट स्टेशन यांनी फिर्याद दिली. फिर्यादी पेट्रोलपंप जवळील शेतामध्ये कामाला असुन अपघात झाल्यावर बघायला गेले असता आपलेच नातेवाईक असल्याची ओळख पटली. पोलीस हवालदार रफीक शेख, काँन्स्टेबल चंद्रजीत बेळ्ळे यांनी अपघाताची माहिती मिळताच तातडीने भेट देऊन पंचनामा केला. प्रेत उत्तरीय तपासणीसाठी अक्कलकोट ग्रामीण रूग्णालय येथे आणण्यात आले. रूग्णालयात अक्कलकोट येथील नातेवाईकांनी गर्दी केली होती.









