झिम्बाब्वेविरुद्ध तिसरा व शेवटचा वनडे सामना आज
वृत्तसंस्था/ हरारे
भारत व यजमान झिम्बाब्वे यांच्यातील तिसरा व शेवटचा वनडे सामना आज सोमवारी येथे होत असून विजयी आघाडी घेतलेला भारतीय संघ क्लीन स्वीप साधण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरेल. भारतीय वेळेनुसार दुपारी 12.45 वाजता सामना सुरू होईल.
यजमान संघाला पहिल्या दोन्ही सामन्यात फारसा जोम दाखविता आला नसल्याने भारताने दोन्ही सामने आरामात जिंकले. त्यामुळे शेवटच्या सामन्यातही भारत त्याचाच कित्ता गिरवित मालिका एकतर्फी जिंकणार, असेच मानले जात आहे. भारताला या सामन्यात पुन्हा एकदा प्रयोग करण्याची संधी मिळणार आहे. पुढील वर्षी होणारी विश्वचषक स्पर्धा लक्षात घेत काही खेळाडूंना आजमावून पाहिले जाऊ शकते. हंगामी कर्णधार केएल राहुल खेळाडूंना मोटिव्हेट करण्यात यशस्वी ठरला असून मिळालेल्या संधीचा ते चांगला उपयोग करीत आपले स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. क्रिकेटपटू म्हणून सुधारणा होण्यासाठी ज्या परीक्षेची गरज असते, तशी परीक्षा मात्र या खेळाडूंची झालेली नाही. पण ज्यांना दीर्घकाळ टिकून राहण्याची इच्छा आहे, त्यांना या मालिकेचा अनुभव गैर वाटणार नाही.

दुसऱया सामन्यात झिम्बाब्वे संघाने सर्व बाद 161 धावा जमविल्या, त्यावरून त्यांच्यात खूप कच्चे दुवे असल्याचे स्पष्ट दिसून येतात. त्यात बदल होण्यासाठी त्यांना फलंदाजीतील उणिवांवर त्वरित उपाययोजना करावी लागेल. त्यांचे गोलंदाजही अव्वल भारतीय फलंदाजांना रोखण्याइतकी भेदकता दाखवू शकलेले नाहीत. शिखर धवनची कामगिरी पाहिल्यास हे स्पष्ट होते. तसेच शुभमन गिलनेही चांगली कामगिरी केली आहे. दोघेही पुन्हा झिम्बाब्वे गोलंदाजांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतील.
दुसऱया सामन्यात केएल राहुल स्वतःला बढती देत सलामीला आला. पण त्याने 9 चेंडूत केवळ 1 धाव जमविली. तो अपशयी ठरला असला तरी त्याने विचलित न होता पुन्हा एकदा तो सलामीलाच खेळण्याचा प्रयत्न करेल. अव्वल गोलंदाजांच्या गैरहजेरीत भारतीय गोलंदाजांनी आतापर्यंतच्या दोन सामन्यांत अप्रतिम कामगिरी करीत आपली क्षमता दाखवून दिली आहे. प्रतिस्पर्धी संघ दुबळा असला तरी दीपक चहर, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, प्रसिद्ध कृष्णा, अक्षर पटेल यांच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. फलंदाजांमध्ये इशान किशन दुसऱया सामन्यात अपयशी ठरला होता. त्याची भरपाई करण्यासाठी मिळालेल्या आणखी एका संधीचा तो निश्चितच लाभ उठवण्याचा प्रयत्न करेल.
पहिल्या सामन्यात भारताकडून दहा गडय़ांनी पराभूत झाल्यानंतर झिम्बाब्वेने दुसऱया सामन्यात पराभवातील फरक थोडा कमी केला. पण या शेवटच्या सामन्यात विजय मिळवायचा असल्यास त्यांना खूप कठोर प्रयत्न करावे लागतील. त्यांना फलंदाजीच्या क्रमवारीतही बदल करण्याचा प्रयोग करावा लागेल. यासाठी सध्या त्यांच्या संघातील सर्वोत्तम फलंदाज सिकंदर रझा व सीन विल्यम्स यांना बढती देण्याचा विचार त्यांना अमलात आणावा लागेल.
संभाव्य संघ
भारत ः केएल राहुल (कर्णधार), धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, अवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, सिराज, दीपक चहर, शाहबाज अहमद.
झिम्बाब्वे ः रेगिस चकबवा (कर्णधार), रेयान बर्ल, तनाका चिवांगा, ब्रॅडली इव्हान्स, ल्युक जाँग्वे, इनोसंट काइया, टी. कैतानो, क्लाईव्ह मॅडेन्डे, वेस्ली मधेवेरे, टी. मरुमणी, जॉन मसारा, टोनी मुन्योंगा, रिचर्ड नेग्राव्हा, व्हिक्टर न्याउची, सीन विल्यम्स, सिकंदर रझा, मिल्टन शुम्बा, डोनाल्ड तिरिपानो.
सामन्याची वेळ ः दुपारी 12.45 पासून
थेट प्रक्षेपण ः सोनी स्पोर्ट्स नेटवर्क.









