ट्रव्हल, हॉटेल बुकिंग क्षेत्रातील कंपनी -नोव्हेंबरमध्ये करार होणार पूर्ण
वृत्तसस्था/ मुंबई
ऑनलाइन ट्रव्हल आणि हॉटेल बुकिंग फर्म क्लिअरट्रीप प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 20 टक्के इतकी हिस्सेदारी खरेदी केल्याची माहिती अदानी समूहाने दिली आहे.
सदरचा खरेदी करार नोव्हेंबरमध्ये पूर्ण होण्याची शक्यता सांगितली जात आहे. अधिकृतरित्या कितपत हिस्सेदारी खरेदी करण्यात आली याची माहिती देण्यात आलेली नाही. तरीही मिळालेल्या माहितीनुसार 20 टक्के इतका वाटा अदानी समूह खरेदी करणार असल्याचे सांगितले जाते.
सदरचा वाटा हा अदानी समूहाच्या सुपर ऍपसाठी फायदाचा ठरणारा आहे, असे बोलले जाते. सुपर ऍपच्या सहाय्याने अदानी समूह विविध ग्राहकोपयोगी सेवा उपलब्ध करणार आहे. रिलायन्स आणि टाटा ग्रुपदेखील सुपर ऍप सुरू करण्याच्या तयारीत आहे.
फ्लिपकार्टकडून अधिग्रहण
याचवर्षी फ्लिपकार्टने क्लिअरट्रीपचे एप्रिलमध्ये अधिग्रहण केले होते. या अधिग्रहणानंतर क्लीअरट्रीपच्या विमान बुकिंगच्या प्रमाणात दहा पट वाढ झाली होती. याचाच अर्थ अधिग्रहणाचा फायदा क्लीअरट्रीपला झाला आहे.
व्यवसाय विस्ताराची संधी- गौतम अदानी
फ्लिपकार्टसोबत आपली भागीदारी ही विस्तारासाठी खूप उपयोगी ठरणार असल्याचे अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी म्हटले आहे. सदरच्या भागीदारीचा कित्येक पटीने आपल्याला आनंद झाला आहे. डाटा सेंटर, लॉजिस्टीक्स आणि आता ट्रव्हल क्षेत्रात विस्ताराची संधी मिळणार आहे. सुपर ऍपच्या साथीने भागीदारी आणखी मजबूत होणार असून नजिकच्या काळात हजारो नोकऱयांची उपलब्धता केली जाणार असल्याचे सुतोवाच गौतम अदानी यांनी केले आहे.









