2020 आर्थिक वर्षात 4 लाखापर्यंत विक्री
वृत्तसंस्था/ बेंगळूर
दमदार वजनी दुचाकी गाडय़ांचा विचार येतो तेव्हा रॉयल इनफिल्डचे नाव आधी समोर येते. त्यांच्याच क्लासिक 350 बीएस-6 या बाईकने सध्या विक्रीत नवा उच्चांक नोंदवला असून कंपनीची सध्या ही बेस्ट सेलींग बाईक ठरली आहे. आर्थिक वर्ष 2020 मध्ये जवळपास 4 लाखाच्या घरात क्लासिक 350 ची विक्री झाली असल्याची माहिती सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्सने दिली आहे.
अलीकडेच या बाईकची सुधारीत आवृती बाजारात आली होती. 1.57 लाख किंमतीच्या या गाडीत इंजिन तसेच सौंदर्याच्याबाबतीत सुधारणा कंपनीने केल्या आहेत. या गाडीने यामुळे अजून लोकप्रियता मिळवली असून लॉकडाऊनच्या काळातही मार्चमध्ये 24 हजारहून अधिक ग्राहकांनी ही गाडी खरेदी केलीय. आर्थिक वर्ष 2020 मध्ये कंपनीने क्लासिक 350 च्या 3 लाख 98 हजार गाडय़ा विक्री करण्यात यश मिळवलंय. मार्च 2020 मध्ये तर 24 हजार 253 ग्राहकांनी ही गाडी खरेदी केली आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळातही या गाडीने कंपनीला चांगला हात दिला आहे. सध्या क्लासिक 350 ही विक्रीतील आघाडीवरची गाडी ठरली आहे.









