ऑनलाईन टीम / पुणे :
प्रेरणा संस्था आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्तय विद्यमाने ‘क्लासिकल अँड बियोंड’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता मनोहर मंगल कार्यालय, एरंडवणा येथे करण्यात आले आहे. अशी माहिती प्रेरणा संस्थेच्या संस्थापिका सानिया पाटणकर यांनी कळवली आहे.
याचवेळी प्रेरणा संस्थेतर्फे कै.कॅप्टन शंकर कृष्ण जोशी यांच्या स्मरणार्थ युवा पुरस्कार देण्यात येणार असून गुरू सुरेश तळवलकर यांचे शिष्य जगमित्र रामलिंग लिंगाडे, वेदांग वीरेंद्र जोशी, भार्गव व्यंकटेश देशमुख आणि गंधार शिंदे, प्रमोद मराठेयांचे शिष्य ऋषीकेश पूजारी, शौनक अभिषेकी यांचे शिष्य विश्वजीत मेस्त्री यांना पंडीत रघुनंदन पणशीकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, यावेळी पंडीत रघुनंदन पणशीकर, गायिका विदुषी सानिया पाटणकर यांच्या गायनासह राजस उपाध्ये यांचे एकल व्हायोलीन वादन होणार आहे. या कसदार सादरीकरणा बरोबरच या सांगितिक प्रवासात खयाल, ठुमरी, दादरा, सरगम गीत, टप्पा, बहुभाषिक लोकसंगीत, भावगीत, गझल, नाट्यगीत, भजन असे संगीताचे विविध प्रकार सादर होणार आहेत. की बोर्डवर अमान वारखेडकर, तबल्यावर प्रशांत पांडव आणि अतुल कांबळे, तर हार्मोनियमवर अभिषेक शिनकर साथ संगत करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन मंजुश्री गाडगीळ करणार आहेत.
कार्यक्रम सर्व रसिकांना विनामूल्य खुला असून कोविड-19 चे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम सादर होणार आहे. तरी सर्व पुणेकर रसिकांनी या संगीत मेजवानीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन प्रेरणा संस्थेच्या संस्थापिका सानिया पाटणकर यांनी केले आहे.