महाराष्ट्रातून येणाऱया प्रवाशांचे खड्डय़ांनी स्वागत : संबंधित अधिकाऱयांनी त्वरित लक्ष देण्याची गरज
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला आहे. मात्र, शहरातील तसेच कॅन्टोन्मेंट परिसरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे शहरामध्ये प्रवेश करणाऱया रस्त्यांचीच अवस्था गंभीर झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातील चंदगडमार्गे येणाऱया प्रवाशांचे स्वागत खड्डय़ांतूनच होत आहे. क्लब रोडवरील गांधी चौकातील रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने वाहने चालविणे कसरतीचे ठरत आहे.
पश्चिम भागाला आणि महाराष्ट्राला जोडणारा मुख्य रस्ता म्हणून बेळगाव-वेंगुर्ला रस्त्याकडे पाहिले जाते. या रस्त्यावर नेहमीच वाहनांची मोठय़ा प्रमाणात वर्दळ असते. मात्र, या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. कारण एखाद्या ठिकाणी डांबरीकरण तर दुसरीकडे कायमस्वरुपीच खड्डे राहात आहेत. क्लब रोडपासून गांधी चौकापर्यंत रस्ता करण्यात आला, मात्र गांधी पुतळय़ाच्या मागील बाजूने हिंडलग्याकडे जाणाऱया रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे वळणाच्या ठिकाणीच हा रस्ता खराब झाला आहे. रस्त्यावर पावसामुळे पाणी साचून रहात आहे. त्या खड्डय़ातून वाहने गेल्यानंतर खड्डय़ातील गढूळ पाणी इतर वाहनांवर व नागरिकांच्या अंगावर उडत आहे. त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. तेव्हा तातडीने त्या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.
जणू कमांडो ट्रेनिंगची सुविधा
हा रस्ता कॅन्टोन्मेंट विभागात येतो. येथे मराठा लाईट इन्फंट्रीचे कमांडो ट्रेनिंग सेंटर आहे. संपूर्ण भारत आणि मित्रराष्ट्रांचे सैनिकही येथे प्रशिक्षणासाठी येतात. या सैनिकांना कॅम्प विभागातून आणि पर्यायाने क्लब रोडवरूनच धावण्यासाठी नेले जाते. पहाटे 3 ते 4.30 या वेळेत हे प्रशिक्षणार्थी कमांडो धावत असतात. जवळपास 50 ते 60 किलोमीटर अंतर हे कमांडो अंगावर 25 किलोचे वजन घेऊन धावतात. त्यामुळे ते अगोदरच खूप थकलेले असतात. अशातच त्यांचा पाय या खड्डय़ात गेला तर त्यांना जबर इजा होण्याची शक्मयता आहे. तेव्हा संबंधित अधिकाऱयांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.









