स्मार्ट सिटी योजनेंतर्गत फुटपाथचे काम अर्धवट असतानाच बसविले दिवे : गटारीसाठी घातलेल्या सळय़ा धोकादायक
प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत हाती घेण्यात आलेली विकासकामे संथगतीने सुरू असल्याच्या तक्रारी करण्यात येत होत्या. पण आता क्लबरोड येथील काम पूर्णपणे बंदच ठेवले असून, अर्धवट कामे झाली आहेत. परिणामी रस्त्याच्या बाजूला उघडय़ा असलेल्या सळय़ा वाहनधारक आणि पादचाऱयांना जीवघेण्या बनल्या आहेत. याकडे स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष झाले असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत हाती घेण्यात आलेली कामे वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. राणी चन्नम्मा चौक ते गांधी चौक (अरगन तलाव) पर्यंतच्या क्लबरोडचा विकास स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात येत आहे. सदर रस्त्याच्या दुतर्फा गटारी आणि पेव्हर्स घालण्याचे काम करण्यात येत आहे. पण या रस्त्याच्या एका बाजूच्या गटारीचे काम पूर्ण झाले असून, दुसऱया बाजूचे काम अर्धवट अवस्थेत आहे. सीपीएड मैदान ते ज्योती कॉलेज गेटपर्यंत गटारीचे बांधकाम रखडले आहे. सदर बांधकाम मागील तीन महिन्यापासून बंद असून रस्त्याशेजारी गटारीसाठी घालण्यात आलेल्या सळय़ा उघडय़ावर सोडण्यात आल्या आहेत. या रस्त्यावरून सीपीएड मैदानावर जाणारे मॉर्निंग वॉकर्स तसेच शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असते. त्यामुळे या सर्वांनाच याचा धोका निर्माण झाला आहे.
या रस्त्यावरील पथदीप बंद आहेत. पण रस्त्याशेजारी फुटपाथवर दिवे बसविण्यात आले आहेत. फुटपाथ पूर्ण झाले नाहीत, पण दिवे बसविण्याचे काम झाले आहे. सीपीएड मैदान परिसरातील फुटपाथचे काम अर्धवट असल्याने हे काम पूर्ण करण्याकडे कंत्राटदार आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष झाले आहे. या रस्त्याशेजारी कामे पूर्ण होण्यास किती वर्षे लागणार अशी विचारणा होत आहे.









