साल्वादोर द मुंद ग्रामसभेत विविध प्रश्नांवरून खडाजंगी : बेकायदा घरांना पाणीपुरवठा केल्याचा आरोप
प्रतिनिधी /म्हापसा
साल्वादोर द मुंद पंचायतीची ग्रामसभा क्रीडा मैदानाच्या प्रश्नावरून गाजली. येथील मैदान एफसी गोवा संघटनेशी करार करण्यात आला असल्याने या मैदानावर स्थानिक खेळाडूंना खेळण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे. यामुळे गैरसोय होत आहे. यासाठी हे मैदान स्थानिकांसाठी खुले करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
स्थानिक पंचायतीला या मैदानाचा आर्थिकदृष्टय़ा कोणताही फायदा नाही. स्थानिकांसाठी मैदान खुले करत नसल्यास सदर करार मागे घेण्याची मागणी सरपंच आग्नेल यांच्याकडे करून धारेवर धरले. यावेळी जोरदार खडाजंगी झाली. पंच संदीप साळगावकर, दिनेश डायस, स्टिफन आल्बुकर्क, मारिओ आताईद, आदींनी या चर्चेत भाग घेतला व स्थानिकांना खेळण्यास हे मैदान खुले करण्याचे सूचित केले.
पंचायतीला कोणताही महसूल मिळत नाही
हे क्रीडा मैदान साल्वादोर द मुंद पंचायतीचे असून ते एफसी गोवाला तीन वर्षांच्या करारावर देण्यात आले आहे. हा करार नोटिशीद्वारे मागे घेण्याची तरतूद आहे, असे सरपंच आंतोनिओ फर्नांडिस यांनी यावेळी स्पष्ट केले. यानंतर ग्रामस्थांशी चर्चा करून हा करार मागे घेण्याचा ठराव घेण्यात आला. एफसी गोवा व जीएसआयडीसी दोन्ही संस्था मैदान आपणच उभारल्याचा दावा करतात. वास्तविक हे मैदान पूर्वीपासून आहे. त्यांनी केवळ मैदानावर लॉन घातले आहे. अशी माहिती सरपंच फर्नांडिस यांनी दिली.
बेकायदा घरांना पाणीपुरवठा!
डोंगराळ परिसरातील घरांना पंच भगवान नाईक यांनी बेकायदा जलवाहिनी टाकून पाणीपुरवठा केला, असा आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला. स्थानिक नागरिकांना पाणी मिळत नाही. आणि बेकायदा वस्तीला पाणीपुरवठा केला जातो हा कुठला न्याय? असा सवाल ग्रामस्थांनी यावेळी केला. यावेळी पंच नाईक यांना धारेवर धरले.
पंचायत क्षेत्रातील उद्यानात सवत्र कचरा साठला आहे. त्याची त्वरित उचल करावी, अशी मागणी पंच संदीप साळगांवकर यांनी यावेळी केली. यावर सरपंच फर्नांडिस यांनी पंचायतीकडे निधी नसल्याचे सांगून मागणी धुडकावून लावली. यावर प्रश्न लोकांच्या वतीने उपस्थित केल्याचे पंच साळगांवकर यांनी सांगितले.
तोर्डा येथे रात्रीच्या वेळी कचरा फेकण्याचे प्रकार सुरू आहे. हा कचरा पंचायतीला उचलावा लागतो. संबंधितावर कडक कारवाई मागणी ग्रामस्थांनी केली.
आपले घर 2017 मध्ये मोडले त्यानंतर नोव्हेंबर 2020 मध्ये या घराकडे येऊन पंच भगवान नाईक यांनी आपल्याकडे 20 हजार रुपयांची मागणी केली.
पंचांवर आरोप केल्यामुळे ग्रामस्थाला काढले बाहेर
अशी तक्रार यावेळी ग्रामस्थ अनिल लोबो यांनी ग्रामसभेत केली. याबाबत तत्कालीक सरपंच संदीप साळगांवकर यांना कल्पना दिली होती. मात्र अद्याप आपले मोडलेले घर पुन्हा बांधण्यासाठी पंचायतीने परवानगी दिली असल्याचा आरोप यांनी केला. या आरोपांवर हरकत घेत नाहक व निराधार आरोप करत असल्याचे सांगून संबंधित ग्रामस्थाला सभेतून बाहेर काढले. हा बदनाम करण्याचे डाव असल्याचे पंच भगवान नाईक यांनी स्पष्ट करून आरोपांचे खंडन केले.









