वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय क्रीडाक्षेत्रामध्ये दर्जा सुधारण्यासाठी भारताने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. देशातील ऍथलिट्सना संपूर्ण सहकार्य तसेच प्रशिक्षण आणि सरावासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने सुमारे पंधराशे प्रशिक्षकांची नियुक्ती लवकरच करण्यात येणार असल्याची घोषणा केली. शुक्रवारी क्रीडामंत्री किरेन रिजिजु यांनी ही माहिती दिली.
भारतीय क्रीडा क्षेत्रामध्ये प्रशिक्षक व इतर पदांसाठी सुमारे पंधराशे जागा भरावयाच्या आहेत. केंद्रीय क्रीडा मंत्रालयातर्फे पंधराशे प्रशिक्षकांची भरती लवकरच करून घेतली जाणार असल्याचे क्रीडामंत्र्यांनी सांगितले. राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त एका समारंभात रिजिजु यांनी ही माहिती दिली. विविध क्रीडा प्रकारातील साहाय्यक प्रशिक्षकांना वरि÷ पातळीवर बढती दिली जाईल. तथापि, प्रशिक्षकासाठी सुमारे पंधराशे जागा सध्या रिकाम्या आहेत. विविध विदेशी प्रशिक्षकांना मानधन देऊन करारबद्ध करण्यात येईल. भारतीय ऍथलिट्सना प्रशिक्षण देण्यासाठी आयोजिलेल्या शिबिरासाठी शासनाकडून निधीची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी दिली.
आसाममध्ये नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेला चांगला प्रतिसाद विविध राज्यातून मिळाला. ही स्पर्धा 13 दिवस चालली होती. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने आपले वर्चस्व ठेवताना 256 पदकांची कमाई केली. 21 वर्षाखालील वयोगटासाठीच्या या स्पर्धेत अनेक राष्ट्रीय विक्रम नोंदविले गेल्याबद्दल रिजिजु यांनी समाधान व्यक्त केले आहे. या स्पर्धेतील यशस्वी कामगिरी करणाऱया काही ऍथलिट्सना ऑलिम्पिकची संधी मिळू शकेल, असेही ते म्हणाले.








