वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचे माजी पॉवरलिफ्टर जोसेफ जेम्स यांना काही दिवसापूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. या व्याधीतून ते आता पूर्णपणे बरे झाले असून क्रीडा मंत्रालयाकडून त्यांना अडीच लाख रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
2008 साली जोसेफ जेम्स यांनी आशियाई पॉवरलिफ्टींग स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. खेळाडूंसाठी असलेल्या पंडित दीन दयाळ उपाध्याय राष्ट्रीय मदतनिधीतून केंद्रीय क्रीडामंत्रालयाने जोसेफ यांना अडीच लाख रूपयांची मदत देण्यासाठी अधिकृत मान्यता दिली आहे. 24 एप्रिल रोजी जोसेफ जेम्स यांना श्वसनक्रियेचा अधिक त्रास जाणवू लागल्याने त्यांना हैद्राबादमध्ये एका रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोना चाचणीमध्ये ते पॉझीटिव्ह असल्याचे आढळून आले. रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याचे आढळून आल्याने त्यांची प्रकृती काही कालावधीत चिंताजनक झाली होती. पण डॉक्टरांच्या इलाजाने ते या व्याधीतून आता पूर्णपणे बरे झाले असून त्यांना 5 मे रोजी रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. काही दिवस त्यांना होम क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळ, भारतीय ऑलिंपिक संघटना आणि केंद्रीय क्रीडामंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने जोसेफ जेम्स यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या मदतीबद्दल जोसेफ यांच्या मुलीने आभार व्यक्त केले आहेत.









