युवकांनी क्रीडा क्षेत्रातील चांगल्या परंपरा जोपासाव्यात : मुख्यमंत्री
प्रतिनिधी/ मुंबई
महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा क्षेत्रातील चांगल्या प्रथा परंपरा जोपासून राज्याला वैभवाचे दिवस आणण्यासाठी युवकांनी कठोर परिश्रम घ्यावेत. शासन खेळांना प्रोत्साहन देत आहे. यापुढेही देणार असून युवकांनी परिश्रम करुन अधिकाधिक पुरस्कार मिळवावेत, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शनिवारी येथे केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘गो गर्ल गो’ या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पंढरीनाथ पठारे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा आणि ‘खेलो इंडिया खेलो युथ’ स्पर्धेतील विजेत्यांच्या सत्कार समारंभात श्री. ठाकरे बोलत होते. यावेळी क्रीडा व युवा कल्याण मंत्री सुनील केदार, पालकमंत्री अस्लम शेख, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार संजय राऊत, आमदार राहुल नार्वेकर, चित्रपट दिग्दर्शक रमेश सिप्पी, क्रीडा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया उपस्थित होते.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज नेहमी विजय प्राप्त करीत. या विजयामध्ये त्यांचे सूत्र होते की, धनसंपत्ती पेक्षा जनसंपत्ती जोपासणे महत्वाचे आहे. स्वतःचे आरोग्य चांगले ठेवून आपल्या राज्याच्या कल्याणासाठी जे चांगले करता येईल, ते केले पाहिजे असे ते म्हणाले.
पुरस्कार हे मिळत नाहीत तर कठोर परिश्रमाने मिळवावे लागतात. राज्यातील खेळाडूंनी अटकेपार झेंडा फडकवून ‘खेलो इंडिया खेलो’ या स्पर्धेत राज्याला देशात अव्वल स्थान मिळवून दिले. त्यामुळे या खेळाडूंचा गौरव करणे हे राज्याचे कर्तव्य होते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी ‘गो गर्ल गो’ या योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. मुलींची शारिरीक तंदुरुस्त राखण्यासाठी तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मोठया संख्येने भाग घेण्यासाठी 1 कोटी 4 लाख मुलींना या योजनेत समाविष्ट करण्यात येणार आहे. मुलींना क्रीडासह सर्व क्षेत्रात यशस्वीतेसाठी ‘गो गर्ल गो’ योजना उपयुक्त ठरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
श्री. केदार यांनी प्रास्ताविक केले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व मान्यवरांच्या हस्ते शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आणि ‘खेलो इंडिया खेलो’ स्पर्धेतील खेळाडूंना पुरस्कार sंप्रदान करण्यात आले. सूत्रसंचालन अभिजित खांडकेकर यांनी केले.
बजरंग, रवी अंतिम फेरीत
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
बजरंग पुनियाने पायाने बचावतंत्रात बरीच प्रगती साधत आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये अंतिम फेरी गाठली असून रवी दहियाने देखील सुवर्णपदकाच्या लढतीसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. गौरव बलियान (79 किलो), सत्यवर्त कडियान (97 किलो) यांनीही या स्पर्धेत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले.
उपांत्य फेरीत बजरंगला केवळ दोनच गुण स्वीकारावे लागले व तो सहजपणे अंतिम फेरीत दाखल झाला. आता अंतिम फेरीत त्याची लढत जपानच्या ताकुतो ओटोगुरोविरुद्ध होईल. उभयतातील ही लढत 2018 वर्ल्ड चॅम्पियनशिप फायनलची पुनरावृत्ती असणार आहे.
यापूर्वी पहिल्या टप्प्यात खराब बचावतंत्र आणि प्रारंभीच प्रतिस्पर्ध्याला मोठी आघाडी बहाल केल्यानंतर 57 किलोग्रॅम वजनगटात बजरंगसमोर अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. पण, शनिवारी येथील उपांत्य लढतीत त्यावर बजरंगने पूर्णपणे मात केल्याचे जाणवले. तांत्रिक सरस खेळाच्या बळावर त्याने सर्व बाऊट सहजपणे जिंकले. ताजिकिस्तानचा शफिरोव्ह, उब्बेकिस्तानचा अब्बोस रखमोनोव्ह व इराणचा अझिम यांना बजरंगने पराभवाचे धक्के दिले.
57 किलो वजनगटात रवी दहियाने जपानच्या युकी ताकाहाशीला 14-5 असे नमवले. शिवाय, मंगोलियाच्या तग्ज बतजर्गलचा धुव्वा उडवला. उपांत्य फेरीत उझबेकिस्तानचा नुरिस्लम सनायेव्हही रवीसमोर फारसे कडवे आव्हान उभे करु शकला नाही. आता अंतिम फेरीत रवीची लढत ताजिकिस्तानच्या हिकमतुल्लो वोहिडोव्हविरुद्ध होईल.









