वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथील डॉ. कर्निसिंग नेमबाजी संकुलामध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या हॉस्टेलचे उद्घाटन केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजु यांच्या हस्ते करण्यात आले. क्रीडापटूंच्या निवासाची सोय या हॉस्टेलमध्ये केली जाणार असून सर्व आधुनिक सुविधा या हॉस्टेलमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
हे संपूर्ण हॉस्टेल क्रीडापटूंसाठी असून या ठिकाणी 162 खाटांची सोय करण्यात आली आहे आणि प्रत्येक खोली वातानुकूलित आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी 12.26 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. ऑलिम्पिक, आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱया ऍथलिट्सना निवासाची सोय असावी, या हेतूने केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून या प्रकल्पाची पूर्तता करण्यात आली आहे. डॉ. कर्निसिंग नेमबाजी संकुलामध्ये असलेल्या शूटींग रेंजवर देशातील नेमबाजांसाठी तीन सत्रांमध्ये सरावाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.