ऑनलाइन टीम नवी दिल्ली
टीम इंडियाचा अष्टपैलू इरफान पठाणने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. हा माझ्यासाठी खूप भावूक क्षण आहे. मी खूप लहान ठिकाणाहून आलोय. मला सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीसारख्या महान खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. हे प्रत्येकाचं स्वप्न असतं,’ अशा शब्दात इरफाननं आपल्या भावना व्यक्त केल्या.
इरफान पठाणने टीम इंडियाकडून 29 कसोटी, 120 वनडे आणि 24 टी 20 सामने खेळले. त्याने 29 कसोटी सामन्यात 100 विकेट घेतल्या. 59 धावात 7 विकेट ही त्याची सर्वोत्तम खेळी होती. त्याने एका कसोटीत 126 धावा देत 12 विकेटही घेतल्या आहेत.
दरम्यान, 2007 साली दक्षिण आफ्रिकेत भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली पहिला टी-20 विश्वचषक जिंकला. या विजयात पठाणचाही मोलाचा वाटा होता.









