वृत्तसंस्था/ राजकोट
सौराष्ट्रचा वेगवान युवा गोलंदाज चेतन साकारिया याचे वडील कनजीभाई साकारिया यांचे रविवारी कोरोनामुळे निधन झाले. भावनगर येथील खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. काही दिवसापूर्वी त्यांना कोरोनाची बाधा झाली होती.
सौराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे कनजीभाई साकारिया यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 2021 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेतन साकारिया राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत होता. 22 वर्षीय चेतन हा डावखुरा वेगवान गोलंदाज असून त्याने सौराष्ट्र संघाकडून 15 प्रथमश्रेणी सामन्यात 41 गडी बाद केले आहेत. राजस्थान रॉयल्सच्या फ्रांचायझीनी चेतन साकारिया कुटुंबियाला आर्थिक साहाय्य करण्याचे आश्वासन दिले आहे.









