वृत्तसंस्था/ कोलंबो
लंकेचा क्रिकेटपटू कुशल मेंडीस याच्या मोटारीने एका सायकलस्वाराला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर लंकेच्या पोलिसांनी कुशल मेंडीसला अटक केली आहे.
कोलंबोतील पेंडुरा या उपनगरातील जुन्या गॅले मार्गावर रविवारी पहाटे कुशल मेंडीसच्या मोटारीचा हा अपघात झाला. या अपघाताची चौकशी पोलीस करण्यापूर्वीच कुशल स्वतः मॅजिस्ट्रेटसमोर हजर झाला, अशी माहिती पोलीस खात्याकडून देण्यात आली. सदर 64 वर्षीय मृत सायकलस्वार हा गोकारिला येथील रहिवासी असल्याचे आढळून आले. कुशलच्या मोटारीची धडक बसताच सदर सायकलस्वार खाली कोसळला. त्याला गंभीर दुखापत झाली होती. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला मृत म्हणून घोषित केले. पोलिसांनी कुशल मेंडीसची गाडी जप्त केली आहे.
25 वषीय कुशल मेंडीस हा लंकन संघातील यष्टीरक्षक आणि फलंदाज असून त्याने आतापर्यंत 44 कसोटी आणि 76 वन डे सामन्यात आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. कोरोना महामारी संकटानंतर लंकन क्रिकेटपटूंसाठी सुरू झालेल्या सराव शिबिरात त्याचा समावेश होता. 2003 साली लंकन संघातील फिरकी गोलंदाज कौशल लोकुआरच्ची याच्या मोटारीने एका महिला पादचारीला धडक दिली होती. या प्रकरणात लोकुआरच्चीला चार वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. कोरोना महामारी परिस्थितीमुळे लंकेचे अनेक क्रिकेट दौरे रद्द झाले असून त्यामध्ये भारताच्या दौऱयाचाही समावेश आहे.









