प्रतिनिधी / सांगली
सांगली येथे 1942 च्या स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक आणि वसंतदादा पाटील यांचे सहकारी स्वातंत्र्य सेनानी जयराम अण्णा कुस्टे यांचे रविवारी पहाटे कोरोनाने निधन झाले. गेले काही दिवस त्यांच्यावर त्यासाठी उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने सांगलीच्या जेल फोडलेल्या रोमांचक इतिहासाच्या शेवटच्या क्रांतिकारकांची अखेर झाली आहे.
मूळचे कोकणातील राजापूर तालुक्यातील चुनाकोळवण गावच्या दैवज्ञ कुटुंबातील जयराम अण्णा यांची नोंदीत जन्मतारीख 24 फेब्रुवारी 1922 अशी आहे. मात्र त्यांचे प्रत्यक्ष वय 104 वर्ष असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. शालेय शिक्षण घेत असतानाच सोनाराच्या कामाचे शिक्षण मिळावे म्हणून वडिलांनी त्यांना कोल्हापूरला पाठवले. मात्र कोल्हापुरात आल्यावर ते स्वातंत्र्यसैनिकांची चळवळ असलेल्या प्रजा परिषदेचे स्वयंसेवक बनले. प्रथम प्रभात फेरी काढणे, पत्रक वाटणे अशी कामे करता करता ते क्रांतिकारकांच्या समूहात सामील झाले.
1939 च्या सुमारास कोल्हापूरच्या भुसारी वाड्यात असलेल्या देवार्या खाली गुप्तपणे स्फोटके तयार करण्याचे शिक्षण त्यानी घेतले. 9 ऑगस्ट 1942 रोजी गांधीजीनी इंग्रजांना चलेजाव चा इशारा आणि देशवासीयांना करेंगे या मरेंगेचा महामंत्र दिला. ब्रिटिशांनी त्यांच्यासह सर्व राष्ट्रीय नेत्यांना तुरुंगात डांबले. त्यामुळे देशभर क्रांतिकारकांनी सरकार विरोधात सशस्त्र उठाव केला. कुष्टे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोल्हापूरच्या रायबाग पार्क येथे सरकारी बंगला, कार्यालय आणि दप्तर जाळून नष्ट केले. तमदलगे येथील चावडीवर बॉम्ब फोडले.
याकाळात भूमिगत क्रांतिकारकांच्या संघटना एकमेकांना मदत करत असत. त्यातूनच त्यांची सांगली जिल्ह्यातील क्रांतिकारक वसंतदादा पाटील यांच्याशी गंगवेस तालमीत भेट झाली. पुढे वसंतदादा, नागनाथ अण्णा नायकवडी, नामदेव कराडकर, जयराम कुष्टे यांनी एकत्रित कार्य केले. 23 जून १९४३ रोजी सांगलीच्या नळभाग येथे पाटील वाड्यात कुष्टे, हिंदुराव पाटील आणि इतर क्रांतिकारक गुप्तपणे राहत होते.
त्यांच्याकडे बंदुकी, काडतुसे यांचा मोठा साठा असल्याची खबर लागताच पोलिसांनी वाड्याला घेरले आणि हिंदुराव पाटील व जयराम अण्णा कुष्टे यांना ताब्यात घेतले. ते हल्ला करतील या भीतीने अनेक पोलीस त्यांच्या अंगावर बसून राहिले. या प्रकरणी त्यांच्यासह वसंतदादा पाटील आणि इतर क्रांतिकारकांना पोलिसांनी अटक केली. अटक होताच पुन्हा क्रांतिकार्यासाठी सांगलीचा जेल फोडायचा असा निर्णय क्रांतिकारकांनी घेतला. अवघ्या एक महिन्यात 24 जुलै 1943 रोजी कुष्टे, वसंत दादा यांच्यासह स्वातंत्र्य सैनिकांनी जेल फोडला. जेलच्या उंचच उंच भिंतीवरून खंदकात उड्या टाकून क्रांतिकारक पसार झाले. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अण्णासाहेब पत्रावळे हुतात्मा झाले. जखमी वसंत दादा आणि कुष्टे यांच्यासह सहकाऱ्यांना अटक झाली.
या प्रकरणी कुष्टे यांना १५ वर्षे शिक्षा ठोठावण्यात आली. त्यांनी गोवा मुक्ती आंदोलनात सहभाग घेतला. हैदराबाद मुक्ती संग्रामात अकलुजच्या चळवळी ला त्यांनी मार्गदर्शन केले. गेली ७४ वर्षे ते सांगलीचे नागरिक म्हणून वास्तव्यास होते. श्वसनाचा त्रास झाल्यानंतर तपासणीत त्यांना कोरोना झाल्याचे आढळले होते. दुपारी त्यांचा मृतदेह प्रशासनाने ताब्यात घेतला असून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Previous Articleसातारा जिल्ह्यात 342 कोरोना बाधित तर 10 मृत्यू
Next Article सातारा : महिला वर्गाला गौरीच्या आगमनाचे वेध








