पंचतारांकित हॉटेलमध्ये दुर्घटना ः 70 जण जखमी
वृत्तसंस्था / हवाना
क्युबाची राजधानी हवानामध्ये शुक्रवारी रात्री एका हॉटेलमध्ये मोठा विस्फोट झाला आहे. सेराटोगा असे नाव असलेल्या हॉटेलच्या ठिकाणी विस्फोटामुळे धूर आणि धुराचे लोट दिसून आले आहेत. बचावपथकाने घटनास्थळी धाव घेत ढिगारा हटविण्याचे काम हाती घेतले आहे. या घटनेत आतापर्यंत 22 जण मृत्युमुखी पडल्याची आणि 70 जण जखमी झाल्याची पुष्टी मिळाली आहे.
हॉटेलमधील हा विस्फोट गॅसगळतीमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. राष्ट्रपती मिगुल डियाज आणि वरिष्ठ मंत्री घटनास्थळी पोहोचले आहेत. मृतांचा आकडा वाढू शकतो. अनेक जण ढिगाऱयाखाली अडकलेले असू शकतात. आतापर्यंत उपलब्ध सर्व पुरावे दुर्घटना घडल्याचा संकेत देत आहेत. विस्फोटाची तीव्रता अधिक असल्याने रस्त्याच्या दुसऱया बाजूला उभी असलेली वाहने आणि लोकांनाही याचा तडाखा बसला आहे.
अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम
एका लिक्विड गॅसच्या टँगरमधून सिलिंडरमध्ये गॅस ट्रान्सफर केला जात असताना स्फोट झाल्याचे सांगण्यात आले. हा विस्फोट क्युबासाठी आर्थिकदृष्टय़ा अत्यंत नुकसानदायक ठरू शकतो. कोरोना महामारीनंतर आता तेथे पर्यटन उद्योगाने वेग पकडला होता. अमेरिकेच्या निर्बंधांमुळे येथील अर्थव्यवस्था बिकट स्थितीला तोंड देत आहे. देशात सरकारच्या विरोधात अनेक निदर्शने देखील झाली आहेत.
प्रसारमाध्यमांना मज्जाव
सेरेटोगा हॉटेल राजधानीतील प्रसिद्ध हॉटेल्सपैकी एक असून यात विदेशी पर्यटकांचे वास्तव्य अधिक असते. प्रसारमाध्यमांना या हॉटेलच्या परिसरात जाण्यापासून रोखण्यात आले आहे. या हॉटेलच्या नजीकच एक प्रसिद्ध शाळा असून ती रिकामी करविण्यात आली आहे. हे हॉटेल 1930 मध्ये निर्माण करण्यात आले होते आणि याला हेरिटेज क्लासिक क्युबन मॉडेल म्हटले जाते.









