भारतीय भूमी सण-उत्सवांनी पूर्वापार समृद्ध असून इथल्या लोकमानसाने बदलत्या ऋतूची दखल घेऊन त्यानुसार सण साजरे करण्याची परंपरा रूढ केलेली आहे. चार महिने कोसळणारा मोसमी पाऊस संपला की, हवामानात जो बदल घडतो त्याची जाणीव लोकांना होते. पावसाची रिपरिप थांबली की, सभोवतालचे चिखलाचे, केर-कचऱयांचे साम्राज्य दूर होईल आणि नव्या उत्साहाने जीवनाला सामोरे जाता येईल, याची जाण असल्याकारणाने त्यासाठी उत्सवाची आणि बदलत्या ऋतूची सांगड घातली. आकाशातले चंद्र, सूर्य, तारका मानवी समाजाला अश्मयुगापासून आकर्षित करत असून त्यांच्याविषयीचा आदर जगभरातील संस्कृतींनी व्यक्त केलेला आहे. मोसमी पावसाने निरोप घेतल्यानंतर आकाशातले काळे ढग लोप पावतात आणि त्यामुळे निरभ्र आकाश लक्ष वेधून घेऊ लागते. हवेत आल्हाददायक गारवा निर्माण होतो आणि अशावेळी काळय़ाकुट्ट अंधाराला भेदणारा चंद्रप्रकाश असेल तर रात्रीचे सौंदर्य अधिकच खुलून उठते.
भारतीय लोकमानसाने वर्षभरातल्या बारा पौर्णिमा महत्त्वाच्या मानलेल्या असून प्रत्येक पौर्णिमेची सांगड सण-उत्सव त्याचप्रमाणे व्रत-वैकल्यांशी घातलेली आहे आणि त्यामुळेच येणाऱया प्रत्येक पौर्णिमेचे त्यांनी मनःपूर्वकरित्या स्वागत केलेले आहे. श्रावण हा हिरवाईमुळे ‘ऋतू हिरवा, ऋतू बरवा’ म्हणून ओळखला जातो तर भाद्रपद म्हणजेच धन-धान्यांच्या समृद्धीचे दर्शन घडविणारा आणि त्यामुळे धरित्रीच्या लाडक्या पुत्राचा म्हणजेच मृण्मयी गणपतीविषयीची कृतज्ञता अभिव्यक्तीचा महिना म्हणून ओळखला जातो. भाद्रपदानंतर येणारा आश्विन भातकापणी आणि दाणे-गोटे घरात आणणारा समृद्धीचा मास म्हणून ओळखला जातो. आश्विनच्या प्रारंभीच घटस्थापनेद्वारे साजरा होणारा नवरात्रीचा उत्सव मातृपूजनाद्वारे आमचे नाते धरित्रीरुपी मातेशी समृद्ध करतो. कुठे सरस्वती, कुठे महिषासूरमर्दिनी तर कुठे महालक्ष्मी आदी दैवतांना माता म्हणून पूजले जाते आणि भाविक नतमस्तक होतात. याच आश्विनातली पौर्णिमा कोजागरी म्हणून साजरी केली जाते. शरदातली हवीहवीशी वाटणारी थंडी आणि त्याच्यासोबत तनामनाला आगळी वेगळी शीतलता आणि आल्हाद देत येणारी पौर्णिमा इथल्या लोकमानसाला विलक्षण भावली. पावसाळी मोसमात पिकलेल्या अन्नधान्यांचे दाणेगोटे घरात आलेले असल्याने इथल्या कष्टकऱयांना आपल्या मेहनतीचे सोने झाल्याचा आनंद लाभलेला असतो आणि त्यामुळे शारदीय चंद्रकलेच्या परिपूर्णतेचे दर्शन घडविणाऱया पौर्णिमेच्या प्रसन्न रात्री धन-धान्य आणि समृद्धीची देवता लक्ष्मीचे आगमन झाल्याचा आभास निर्माण होतो आणि त्यामुळे धर्मभोळय़ा लोकमनाला साक्षात लक्ष्मीदेवी आपल्या सुख-समृद्धीचे वरदान घेऊन फिरत असल्याची प्रचिती येते. या रात्री लक्ष्मी भूतलावरती येते व ‘को जागर्ति’ म्हणजे कोण जागा आहे? अशी विचारणा करते आणि ही रात्र जागविणाऱयांवरती धन-धान्याची पखरण करते, अशी पूर्वापार लोकश्रद्धा निर्माण झालेली आहे.
आश्विनातील या पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी व ऐरावतावरती आसनस्थ झालेल्या इंद्राची पूजा करतात. त्यानंतर पोहे व नारळाचे पाणी देव-पितरांना अर्पण करून त्याचे सेवन आप्तेष्टांबरोबर करण्याची परंपरा आहे. पूर्ण कलांनी विकसित झालेल्या चंद्राला भारतीयांनी दैवत मानलेले असून कोजागरीला चंद्राची पूजा करून त्याला दूध व खीर यांचा नैवेद्य अर्पण करतात. उपस्थितांना केशरी दूध दिले जाते. आश्विन पौर्णिमेच्या या उत्सवाला वात्स्यायनाने कौमुदी जागर तर वामन पुराणात त्याचा उल्लेख दीपदान जागर असा केलेला आहे. बौद्ध काळातही कौमुदी उत्सव साजरा केला जायचा. या दिवशी उत्साहाचे वातावरण पसरलेले असायचे. लोक आपली घरेदारे पुष्पमालांनी सजवित, घरावरती ध्वज लावत आणि रात्रीच्यावेळी दीपाराधना करीत. जागोजागी नृत्य, गायन आणि वादनाच्या मैफिली संपन्न होत. लोक भक्ती, सद्भावना, प्रेमादर अभिव्यक्त करण्यासाठी कोजागरीच्या रात्रीचा उपयोग उत्साहाने करीत होते. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह असून तो पृथ्वीभोवती फिरत असतो. सूर्याचा प्रकाश त्याच्यावर पडतो व तोच परावर्तित होऊन पृथ्वीवर येतो. त्यालाच ‘चांदणे’ अशी संज्ञा आहे. हे चांदणे खरेतर सूर्याचेच किरण असते. चंद्राच्या आकर्षणामुळे समुद्राचे पाणी ओढले जाते आणि त्यामुळे भरती येते. शरदात चंद्राच्या सोळाही कला विकसित होऊन पृथ्वी त्या रात्री शारदीय चंद्रकलेच्या वर्षावात न्हाते आणि त्याचे चांगले परिणाम मानवी समाजावरती होतात, अशी लोकश्रद्धा रूढ आहे.
आपल्या लोकमानसाने चंद्राचा संबंध गर्भाशी जोडलेला असून प्रसूती सुलभ होण्यासाठी चंद्रकिरणांचे साहाय्य होते आणि चंद्र किरणांतून अमृतधारा स्त्रवतात. चंद्राच्या ठिकाणी रोगनिवारक शक्ती असून कोजागरी पौर्णिमेला वारंवार चंद्रदर्शन केल्यास दृष्टी तीक्ष्ण होते, असे मानले जाते. तसेच या रात्री चंद्र किरणात दूध ठेवून ते प्राशन केले तर चंद्रामृत प्याल्याचे श्रेय लाभते, असे मानलेले आहे. शीतल, सौम्य आणि सुंदर असल्याने चंद्र प्रिय मानलेला आहे. शरत्कालीन चंद्राचे वैभव भारतीय साहित्यकारांनी सुरेखरित्या वर्णन केलेले आहे. चंद्र दर्शनाने कुमुदिनी जशी प्रफुल्लित होते त्याचप्रमाणे शारदीय चंद्रकला कवींना भुलवित असते. भारतीय धर्माने चंद्राला देव कल्पून, तो श्वेतांबरधारी, दोन्ही हातात पांढरी कुमुदे धारण केलेला दाखविलेला आहे. सागर मंथनातून चंद्राची निर्मिती झाली असल्याचे मानलेले आहे आणि त्यामुळे चंद्राचे केवळ सौंदर्याचे प्रतीकच म्हणून नव्हे तर त्याहीपेक्षा मोठे स्थान असल्याचे लोकमानसाने मानले आहे. पावसाळी मोसमानंतर शरद ऋतुचे आगमन झाल्याची वर्दी कोजागरी पौर्णिमेच्या चांदण्याद्वारे लाभते आणि त्यासाठी इष्टमित्रांसह चांदण्या रात्री केशर घातलेले दूध पिण्याबरोबर नृत्य, गायन आदी कलांच्या सादरीकरणाचा आस्वाद घेण्याची परंपरा लोकमानसाने निर्माण केली. त्यातून निसर्गाविषयीचे प्रेम आणि आदर उत्कटपणे व्यक्त करण्याची वृत्ती दृष्टीस पडते.
राजेंद्र पां. केरकर








