कोकणात तब्बल 38 वर्षानंतर पुन्हा एकदा जल वाहतुकीला प्रारंभ होत आहे. त्याकरिता रो-रो बोट सेवेची चाचणी नुकतीच यशस्वीपणे पार पडली आहे. त्यामुळे मुंबईतून रत्नागिरी, सिंधुदुर्ग व गोव्यापर्यंत जल प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कमी वेळेत आणि सुखकर प्रवास करता येणार आहे. त्याचबरोबर कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना जल पर्यटनाचा आनंदही लुटता येणार आहे. राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे यांच्या पुढाकारातून सुरू होणारी रो-रो बोट सेवा नियमित सुरू राहिल्यास कोकणच्या पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.
मुंबई ते विजयदुर्ग या सागरी रोल-ऑन, रोल-
ऑफ (रो-रो) या बोट सेवेची प्राथमिक चाचणी 3 सप्टेंबर रोजी घेण्यात आली. ‘एमटूएम फेरीज’ कंपनीच्या ‘एमटूएम प्रिन्सेस’ या प्रवासी बोटीची चाचणी यशस्वी झाली. रो-रो बोट सेवा चाचणीसाठी मुंबईहून विजयदुर्ग बंदरात दाखल झाल्यानंतर तेथे नव्याने बांधण्यात आलेल्या जेटीवरून या प्रवासी बोटीमध्ये चारचाकी वाहने चढवून प्रात्यक्षिकही घेण्यात आले. त्यामुळे तब्बल 38 वर्षानंतर पुन्हा एकदा जल प्रवास सुरू होणार हे निश्चित झाले असून लवकरच मुंबई ते रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा असा हा जल प्रवास होणार आहे.
मुंबई ते गोवा जल मार्गावर कोकणात 1988 पर्यंत जल वाहतूक केली जात होती. नंतर तिकीट दराचा वाद व अन्य काही कारणास्तव जल वाहतूक बंद पडली होती. ती आतापर्यंत सुरुच नव्हती. किंबहुना ती सुरू होण्यासाठी कुणी विशेष प्रयत्नच केले नाहीत. मात्र, कोकणात वेगवेगळ्या मार्गाने येणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन जल वाहतूक सुरू करावी, अशी सातत्याने मागणी प्रवासी वर्गातून सुरू होती. कोकण रेल्वे सुरू होण्यापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग हा एकमेव प्रवास मार्ग सुरू होता. परंतु, कोकणात येणारे कोकणवासी आणि पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता, कोकण रेल्वे सुरू झाली. त्याशिवाय मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वास न गेल्याने अजूनही चाकरमान्यांना खडतर प्रवास करावा लागत आहे. कोकण रेल्वेचा एकेरी मार्ग असल्याने रेल्वेमध्ये तुडुंब गर्दी आणि रेल्वे प्रवासाला वेळही जास्त लागत आहे. रेल्वेने 9 तास आणि बसने 12 तास लागत आहेत. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना आणखी एक चांगला पर्याय म्हणून जलप्रवास सुरू व्हावा, अशी अपेक्षा होती. कोकणवासी जलप्रवासाचे हे स्वप्न अनेक वर्षांपासून बाळगून आहेत. हे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार असून त्यासाठी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकासमंत्री नीतेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. कोकणातील नीतेश राणे या खात्याचे मंत्री होताच, खऱ्या अर्थाने या खात्याला आणि कोकणवासीयांना न्याय द्यायला सुरुवात केली आहे व जल प्रवासाच्या स्वप्नपूर्तीसाठी पुरेपूर प्रयत्न केले आहेत.
कोकणचे सुपुत्र असलेले नीतेश राणे यांनी मत्स्य व्यवसाय व बंदर विकास खात्याचा पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी कोकणातील बंदर विकास, बंदर सुरक्षितता, मच्छीमारांचा विकास, मच्छीमारांना शेतकऱ्यांचा दर्जा यासह पर्यटन वाढीच्या दृष्टीने अनेक धाडसी पावले उचलण्यास सुरुवात केली. ड्रोन यंत्रणेपासून ते विजयदुर्ग जेटीचे काम युद्धपातळीवर करायला लावले. रो-रो बोट सेवा सुरू करण्याची ज्यावेळी घोषणा केली, त्यावेळी अनेक शंका उपस्थित केल्या गेल्या. अनेक वर्ष बंद असलेली बोट सेवा सुरू होणार का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. मात्र, मंत्री राणे नुसती घोषणा करून थांबले नाहीत, त्यांनी बोट सेवा सुरू होण्यासाठी तसे प्रयत्न सुरू केले. त्यासाठी आवश्यक बैठका घेत, कार्यवाही सुरू केली. विजयदुर्ग जेटीचे कामही पूर्णत्वास नेले. त्यांनी बोटीची पाहणीही केली. त्यांच्या या अथक प्रयत्नांनंतर 3 सप्टेंबर रोजी रो-रो बोट सेवेची चाचणीही यशस्वीपणे पार पडली आहे.
कोकणात मुंबई&-सिंधुदुर्ग असा रो-रो बोट सेवेद्वारे जलप्रवास सुरू होणार असून पुढील काळात तो गोव्यापर्यंतही सुरू राहणार आहे. मुंबई येथील भाऊच्या धक्क्यावरून अवघ्या 3 तासांत रत्नागिरी-रायगड, तर 5 ते 6 तासांत सिंधुदुर्ग-विजयदुर्गला येता येणार आहे. या बोटीतून जल प्रवास करण्याबरोबरच स्वत:ची गाडीही बोटीतून आणता येणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एका टोकाला विजयदुर्ग असले, तरी बोटीतून गाड्याही आणता येणार आहेत व पर्यटकांना जिल्ह्यात गाडीने फिरता येणार आहे. कोकणवासीयांना आपल्या गावापर्यंत गाडी नेता येणार आहे.
कोकणसाठी सुरू होत असलेली रो-रो ही जल प्रवास करणारी बोट जयगड व विजयदुर्ग बंदर या ठराविक ठिकाणीच थांबली, तरी बंद पडलेली बोट सेवा सुरू होणे हीच फार मोठी उपलब्धी आहे आणि एकदा का नियमित बोट सेवा सुरू झाली, तर मालवण, वेंगुर्ले व अन्य काही ठिकाणी ही बोट थांबू शकते. विजयदुर्ग बंदर हे एका बाजूला असल्याने जिल्ह्यात येणाऱ्या लोकांना किंवा पर्यटकांना अडचणीचे वाटत असले, तरी भविष्यात मालवण-वेंगुर्ले येथेही जेटी बांधण्यासाठी मत्स्य व्यवसाय व बंदर विकासमंत्री नीतेश राणे प्रयत्नशिल आहेत. त्यामुळे तोही प्रश्न सुटेल. तसेच जल प्रवास करणे हा वेगळा सुखद आनंद देणारा प्रवास राहणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजीही घेण्यात आलेली आहे. आज कोकणात पर्यटन बहरत आहे. रेल्वे, बस, विमान या विविध मार्गाने पर्यटक येत असताना आता जल प्रवासाचा मार्गही उपलब्ध झालेला आहे. पर्यटकांना समुद्र किनारे, जलक्रीडा, समुद्र भ्रमंती याचे मोठे आकर्षण असते. त्यामुळे जल प्रवासातून आनंद घेत कोकणातील समुद्र किनाऱ्यावर जल पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. त्यामुळे कोकणातील बोट सेवेचे स्वागत तर व्हायला हवे. मुंबई ते सिंधुदुर्ग रो-रो बोट सेवा नियमित सुरू राहिल्यास कोकणातील पर्यटनाला फार मोठी चालना मिळणार आहे. पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत. या रो-रो बोट सेवेतून जल प्रवास करण्याची उत्सुकता वाढली आहे. कोकणात रो-रो बोट सेवा सुरू होण्यासाठी मंत्री राणेंनी पुढाकार घेत मोठे प्रयत्न केले आहेत. केंद्रीय शिपिंग मंत्रालय व राज्याच्या बंदरे विभागाकडून जल वाहतूक सेवेस मंजुरी मिळवून घेतली आहे. या रो-रो सेवेसाठी अनेक परवानग्या घेण्याची गरज असते. अशा अत्यावश्यक असणाऱ्या एकूण 147 परवानग्या घ्याव्या लागल्या आहेत. या बोटीच्या माध्यमातून सुरक्षित आणि जलद प्रवास होणार असल्याने सर्व परवानगी घेऊनच ही बोट सेवा सुरू करण्यात येत आहे. 25 नॉटस स्पीडची ही ‘एमटूएम फेरीज’ कंपनीचीही ‘एमटूएम प्रिन्सेस’ या नावाची रो-रो बोट असणार आहे. जी दक्षिण आशियातील वेगवान बोट आहे.
रो-रो बोटीमध्ये इकॉनॉमी वर्गात 552 आसनांची व्यवस्था, प्रिमियम इकॉनॉमीमध्ये 44, बिझनेसमध्ये 48, तर फर्स्ट क्लासमध्ये 12 प्रवाशांची क्षमता असणार आहे. तसेच 50 चार चाकी, 30 दुचाकी राहण्याची क्षमता असलेली ही रो-रो बोट सेवा आहे. यासाठी कोकणवासीयांना इकॉनॉमी क्लाससाठी 2500, प्रिमियम
इकॉनॉमीसाठी 4 हजार, बिझनेस क्लाससाठी 7500, फर्स्ट क्लाससाठी 9 हजार रुपये दर आकारला जाणार आहे. चारचाकीसाठी 6 हजार, दुचाकीसाठी 1 हजार, सायकलसाठी 600, मिनी बससाठी 13 हजार रुपये आणि बसच्या आसन क्षमतेप्रमाणे दर वाढत जाणार आहेत. रो-रो बोट सेवा ही एक प्रवास करण्याचा मार्ग असली तरी कमी वेळेत, सुखकर प्रवास आणि तेवढाच आनंद देणारा असणार आहे. त्यामुळे रो-रो बोट सेवा नियमित सुरू राहील ही अपेक्षा असून कोकणवासीयांसाठी रो-रो बोट सेवा सुरू होणे म्हणजे मैलाचा दगड ठरणार आहे.
संदीप गावडे








