वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय संघ आयपीएल संपल्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱयावर जाणार असून टी-20, वनडे मालिकानंतर चार सामन्यांची कसोटी मालिकाही होणार आहे. यातील शेवटच्या दोन कसोटी कर्णधार विराट कोहलीला हुकण्याची शक्यता आहे. पहिल्या अपत्याच्या प्रतीक्षेत असल्याने तो जानेवारीत मायदेशी परतण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे केएल राहुलला मध्यफळीत खेळण्यासाठी प्रवेश मिळणार आहे.
जानेवारीच्या सुरुवातीस त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माची डिलिव्हरी होणार आहे. या संदर्भात कर्णधार कोहलीने अधिकृत काहीही सांगितले नसले तरी कसोटी मालिकेतील शेवटचे दोन सामने तो खेळणार नसल्याचे बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले. 17 डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. ‘एखादी कसोटी चुकवून तो शेवटची कसोटी खेळण्यासाठी परत येऊ शकला असता. पण क्वारंटाईनच्या कालावधीचा विचार करता त्याला तसे करता येणे शक्य होणार नाही. त्यामुळे त्याला ब्रेक घ्यावा लागणार आहे,’ असे या सूत्राने सांगितले.
अशा परिस्थितीत केएल राहुलचे असणे संघाला फायद्याचे ठरू शकते, असाही विचार करण्यात येत आहे. कसोटी मालिकेआधी रोहित शर्मा पूर्ण तंदुरुस्त होण्याची अपेक्षा असून तो, मयांक अगरवाल व पृथ्वी शॉ हे सलामीचे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र कोहली मायदेशी परतल्यावर मध्यफळी बळकट करण्याची गरज लागणार आहे. त्यासाठी राहुलला संधी दिली जाणार आहे.
रोहित शर्मा संघासोबत प्रयाण करणार?
रोहित शर्माचा ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी संघात समावेश केलेला नसला तरी तो मुंबई इंडियन्सच्या मागील दोन सामन्यात भाग घेतला असल्याने बीसीसीआयमधील पदाधिकारी त्याला संघासोबतच 11 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाला पाठविण्याचा विचार करीत आहेत. ‘या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. त्याने संघासोबत राहूनच फिजिओ नितिन पटेल व ट्रेनर निक वेब यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी करणे योग्य ठरेल,’ असे या सूत्राने सांगितले. गरज पडल्यास रोहितला 27 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱया वनडे मालिकेसाठी विश्रांती दिली जाईल आणि टी-20 मध्ये पुन्हा तो खेळू शकेल. कसोटी मालिका सुरू होण्याआधी तो पूर्ण तंदुरुस्त झालेला असेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.









