तिसऱया टप्प्यातील चाचणीचा निष्कर्ष -लोकांमधील भीती दूर होण्याची चिन्हे
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
‘भारत बायोटेक’ निर्मित कोव्हॅक्सिनच्या तिसऱया टप्प्यातील चाचणीचे निष्कर्ष जाहीर झाले असून ही लस 81 टक्के परिणामकारक असल्याची स्पष्टोक्ती देण्यात आली आहे. हैदराबादस्थित ‘भारत बायोटेक’ कंपनीसह ‘आयसीएमआर’ने संयुक्तपणे यासंबंधी निवेदन जारी केले आहे. या सकारात्मक निष्कर्षामुळे लोकांमधील भीती दूर होऊन ‘स्वदेशी’ लस घेण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच दुसऱया टप्प्यातील लसीकरणाच्या पहिल्या दिवशी 1 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’चा डोस घेतला. त्यानंतर मंगळवारी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासहीत अन्य काही केंद्रीय मंत्र्यांनी हीच लस घेतल्याने ‘स्वदेशी’चा नारा बुलंद होत आहे.
‘कोव्हॅक्सिन’ लसीच्या वेगवेगळय़ा वयोगटानुसार तीन टप्प्यात सराव चाचण्या घेण्यात आल्या होत्या. तीन टप्प्यात स्वयंसेवकांना डोस देण्यात आले. या सराव चाचणीतील निष्कर्ष हाती आले आहेत. सकारात्मक निष्कर्षांमुळे कंपनीने एक महत्त्वाचा माईलस्टोन गाठल्याचे गौरवोद्गार भारत बायोटेकचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा इल्ला यांनी काढले आहेत. हे निष्कर्ष म्हणजे विज्ञान आणि कोरोना विषाणूविरोधातील लढय़ाचे मोठे यश असल्याचेही त्यांनी पुढे स्पष्ट पेले. तिन्ही सराव चाचण्यांमध्ये जवळपास 27 हजार जणांनी सहभाग दर्शवल्याचेही त्यांनी सांगितले.
साईड इफेक्टची भीती दूर होणार
दीड महिन्यापूर्वीपासून देशात लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी लसीच्या दुष्परिणामांचा म्हणजेच साईड इफेक्टचा संभ्रम अद्यापही सर्वसामान्यांच्या मनामध्ये कायम आहे. अनेकांच्या मनात लसीच्या दुष्परिणामांची भीती आहे. कोरोना लसीकरण मोहिमेसाठी भारत सरकारने सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाच्या ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. पण ‘कोव्हिशिल्ड’ किंवा ‘कोव्हॅक्सिन’चा डोस घेण्याआधी साईड इफेक्टबाबत लाभार्थी विचारणा करत असल्याने यासंदर्भात कंपन्यांनी तसेच केंद्र सरकारने लस कोणी घ्यावी किंवा कोणी घेऊ नये याबद्दलची माहिती दिली आहे.
माहितीपत्रक प्रसिद्ध
‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ दोन्ही लसी या सुरक्षित असल्याचे सरकारने म्हटले आहे. पण या दोन्ही लसींचे काही सर्वसामान्य साईड इफेक्ट असल्याचेही सांगण्यात येत आहे. लसनिर्मिती करणाऱया दोन्ही कंपन्यांनी आपल्या अधिकृत वेबसाईटवर लस घेतल्यानंतर काय दुष्परिणाम दिसून येतात यासंदर्भातील ‘फॅक्ट शीट’ म्हणजेच माहितीपत्रक शेअर केले आहे. तसेच कोणताही त्रास जाणवल्यास वैद्यकीय सल्ला घेण्याची सूचना केली आहे.









