लंडन / वृत्तसंस्था
भारताच्या इशाऱयानंतर अखेर ब्रिटनने आपत्कालीन वापरासाठीच्या यादीत कोव्हिशिल्ड लसीचा समावेश केला आहे. मात्र भारतात लसीकरणानंतर दिल्या जाणाऱया को-विन सर्टिफिकेटला मात्र मान्यता दिलेली नाही. कोव्हिशिल्डवरील लस धोरणासंबंधी भारताने दबाव टाकल्यानंतर अखेर ब्रिटनने नियमावलीत मोठा बदल केला आहे. यूकेने आता भारतनिर्मित कोव्हिशिल्डला मान्यताप्राप्त लस म्हणून स्वीकारले आहे.
ब्रिटनने लसीकरणासंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार जर एखाद्या भारतीयाने कोव्हिशिल्डची कोरोना लस घेतली असेल आणि यूकेला गेला असेल तर त्याला क्वारंटाईन राहणे आवश्यक आहे. तथापि ‘प्रमाणपत्र’चा मुद्दा अद्याप प्रलंबित आहे. ब्रिटनची नवी नियमावली 4 ऑक्टोबरपासून लागू केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या या गाईडलाईन्समध्ये कोव्हिशिल्ड लसीला मान्यता देण्यात आली नव्हती. ताज्या ट्रव्हल ऍडव्हायझरीमध्ये ऍस्ट्रजेनिका, कोव्हिशिल्ड, ऍस्ट्राजेनिका व्हॅक्सजेवेरियासह अन्य काही लसींचा समावेश करण्यात आला आहे.








