अंतर वाढवले – लसीकरणासंबंधी केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतात कोरोनावर देण्यात येणाऱया कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसमध्ये आता 6 ते 8 आठवडय़ांचे अंतर असणार आहे. या आधी पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस 4 ते 6 आठवडय़ांच्या आत घेतला जायचा, परंतु आता या डोसमधील अंतर वाढविण्यात आले आहे. तथापि, दोन डोसमधील अंतर वाढविण्याचा निर्णय केवळ ‘कोव्हिशिल्ड’ला लागू आहे, ‘कोव्हॅक्सिन’ लससाठी नसल्याची स्पष्टोक्तीही देण्यात आली आहे. यासंदर्भात, सोमवारी केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी आतापासून कोव्हिशिल्ड लसीच्या पहिल्या आणि दुसऱया डोसमधील अंतर किती असावे याचा उल्लेख केला आहे. सोबतच त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
नॅशनल टेक्निकल ऍडवायजरी ग्रुप ऑन ईम्यूनायझेशन आणि नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन ऍडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड-19 या बैठकीत घेतलेल्या निर्णयानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला यासंबंधी सल्ला देण्यात आला. या सल्ल्याचा विचार करत केंद्र सरकारने कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस आणि दुसऱया डोसमधील अंतर 6 ते 8 आठवडय़ांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत केंद्राने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. त्यानुसार कोव्हिशिल्डचा दुसरा डोस 6 ते 8 आठवडय़ांच्या दरम्यान दिल्यास अधिक लाभदायक फायदे होतील, अशी स्पष्टोक्ती देण्यात आली आहे.
केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्राच्या माध्यमातून नवी नियमावली पाठवली आहे. या नियमांसंबंधी संबंधित अधिकाऱयांना तातडीने आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच लसीकरणाच्या कार्यक्रमात कोणताही खंड पडणार नाही याची काळजी घेण्याची सूचना केली आहे. भारतात आपत्कालीन वापरासाठी दोन कोरोना लस मंजूर झाल्या आहेत. भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ आणि सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाची ‘कोव्हिशिल्ड’ ही लस सध्या भारतात सुरू असलेल्या लसीकरणात वापरली जात आहे.









