जपानचे पंतप्रधान शिन्झो ऍबे यांचे स्पष्टीकरण, 2021 मध्येही ऑलिम्पिकची शक्यता धुसर
वृत्तसंस्था/ टोकियो
कोरोना व्हायरसचा पूर्ण नायनाट होऊ शकला तरच पुढील वर्षी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा होऊ शकेल, असे जपानचे पंतप्रधान शिन्झो ऍबे यांनी बुधवारी स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती व जपान प्रशासनाने यंदा होणारी ही ऑलिम्पिक स्पर्धा 2021 पर्यंत लांबणीवर टाकली आहे.
कोव्हिड-19 विरुद्ध अवघ्या जागतिक स्तरावर लढा सुरु आहे. पण, कोव्हिडचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत चालला असून तो रोखण्यासाठी नजीकच्या भविष्यात लस तयार होणे दृष्टिक्षेपात नाही. त्या पार्श्वभूमीवर, पुढील वर्षी देखील ऑलिम्पिक होणे कठीण असल्याची भीती आयोजन समितीतील पदाधिकाऱयांनी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
‘ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक स्पर्धा कोणतीही काटछाट न करता पूर्ण भरवावी, हे आमचे लक्ष्य आहे आणि त्यासाठी कोव्हिडचे संकट पूर्णपणे नष्ट झालेले असणे आवश्यक आहे. अन्यथा, आम्हाला अपेक्षित पद्धतीने स्पर्धा भरवणे अजिबात शक्य होणार नाही’, असे शिन्झो याप्रसंगी म्हणाले.
जपानमध्ये कोव्हिड-19 चे वादळ घोंघावत राहिले असून मंगळवारी तेथे एकाच दिवशी 111 जण पॉझिटिव्ह आढळून आले. बुधवारची आकडेवारी अद्याप उपलब्ध झालेली नव्हती. जपानमध्ये मंगळवारपर्यंत एकूण 13895 जणांना कोरोनाची लागण झाली असून यात 413 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अन्य बडय़ा देशांच्या तुलनेत ही आकडेवारी नियंत्रणात आहे. पण, तरीही जपान या भीषण समस्येकडे आवश्यक त्या गांभीर्याने पाहत नसल्याची टीका सातत्याने होत आली आहे.









