ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात लसींचा तुटवडा असल्याने अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद आहेत. लसींचे उत्पादन वाढवून लसीकरण मोहिमेला गती देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी मुंबईस्थित हाफकिन बायोफार्मास्युटीकल कॉर्पोरेशन लिमिटेडला ‘कोवॅक्सिन’ लसीचे एका वर्षात 22.8 कोटी डोस तयार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी सरकारकडून या कंपनीला 159 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. एका वृत्तवाहिनीने सुत्रांच्या हवाल्याने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
भारत बायोटेक कंपनीने हाफकिनला हस्तांतरण प्रक्रियेनुसार कोवॅक्सिन लस उत्पादनाचे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे. हाफकिन मुंबईतील परेल कॉम्प्लेक्समधील कंपनीत या लसीचे उत्पादन करणार आहे. या लसींच्या उत्पादनासाठी हाफकिनला केंद्र सरकारकडून 65 कोटी तर राज्य सरकारकडून 94 कोटी असे एकून 159 कोटी रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
हाफकिनला लस निर्मितीसाठी 8 महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून, या काळात कंपनी 22.8 कोटी डोस तयार करणार आहे.









