प्रतिनिधी/ मनीषा सुभेदार
कोविड-19 मध्ये आपल्या डोळय़ांची आवर्जुन काळजी घेतली पाहिजे. आपण विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून मास्क लावतो आहोत. परंतु सामान्य अशुंमधून सुद्धा विषाणूचा संसर्ग होऊ शकतो, हे आपण लक्षात घ्यायला हवे. या शिवाय कोविड-19 ची लक्षणे असोत किंवा नसोत, सर्व तऱहेच्या स्क्रीनचा वापर कसा करावा, हे लक्षात घ्यायला हवे. यासाठीच्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे मत नेत्रतज्ञ डॉ. शिल्पा कोडकणी यांनी व्यक्त केले.
सध्या बहुसंख्य विद्यार्थ्यांचे वर्ग व शिक्षण ऑनलाईन पद्धतीने चालत आहे. नर्सरी व केजीच्या मुलांसाठी ऑनलाईन शिक्षण असावे की नसावे, कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर डोळय़ांची कशी काळजी घ्यावी? याबद्दल त्यांच्याशी चर्चा करता त्यांनी उपरोक्त माहिती दिली.
त्या म्हणाल्या, आपण चेहऱयाला, डोळय़ाला, तोंडाला हात लावतो. हाच हात आपल्या डोळय़ाला कधीही लावू नये. अनेक जण मास्क घालतात. पण तो गळय़ावर ठेवतात, हे अत्यंत चूक आहे. मास्क हा नेहमी नाक आणि तोंड बंद करण्यासाठी वापरला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे अश्रुंमधूनसुद्धा विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. डोळय़ांसाठी सामाजिक अंतर राखले तर अश्रुंमधून विषाणू आपल्यापर्यंत येण्याची शक्मयता कमी असते.
कोविड-19 लक्षणांचा माणूस असेल त्याने डोळय़ाला हात लावला, तोच हात त्याने टेबलाला लावला आणि दुसरी व्यक्ती येऊन त्या टेबलाला हात लावून गेली तर त्याचा संसर्ग होण्याची शक्मयता असते. अश्रुंमधून कोविड-19 ची लक्षणे आढळतीलच असे नाही. परंतु त्याची शक्मयताही नाकारता येत नाही. डोळे आलेल्या लोकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. कारण डोळे येणे हे कोरोनाचे एक लक्षण असू शकते. कोणालाही ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आली की जसे विलगीकरण केले जाते तसेच डोळे आल्यावर विलगीकरण करणे आवश्यक आहे.
लॉकडाऊन काळात स्क्रीनचा अधिक वापर झाला. त्याने डोळय़ांना इजा होते का, या प्रश्नावर त्या म्हणाल्या, लॉकडाऊनमध्ये स्क्रीनटाईम वाढला. विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लास घेण्यात आले. परंतु योग्य झोप झाली नाही तर डोळय़ांवर ताण पडतो. सामान्यतः एका मिनिटाला डोळय़ांची 15 ते 20 वेळा उघडझाप होते. याला डोळय़ाचा ब्लिंकरेट असे म्हटले जाते. आपल्या डोळय़ात जे अश्रू निर्माण होतात त्याने डोळे ओलसर राहतात. परंतु स्क्रीन टाईमच्या अति वापराने डोळे ओलसर राहू शकत नाहीत. ब्लिंकरेट कमी होतो. त्याचा डोळय़ावर परिणाम होऊ शकतो.
पालकांनी लक्ष ठेवणे गरजेचे
संगणक, टीव्ही, मोबाईल इतकेच नव्हे तर फार जवळ नेऊन पुस्तक वाचले तरी डोळय़ांची उघडझाप करण्याचे प्रमाण कमी होते व डोळे कोरडे होऊ शकतात. अशा समस्येला ‘कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम’ असे म्हटले जाते. आजकाल सर्व तऱहेचे स्क्रीन त्रासदायक ठरतात. मुलांना ते समजून येत नाहीत. त्यांच्या डोळय़ावर ताण पडतो, हे पालकांनी लक्षात घ्यायला हवे. मुले मुठीने डोळे चोळत नाहीत ना याकडे पालकांनी लक्ष ठेवले पाहिजे.
दुसरे म्हणजे स्क्रीनचा वापर करताना ‘फॉलो द रुल ऑफ 20’चा अवलंब केला पाहिजे. याचाच अर्थ दर 20 मिनिटांनी एकदा 20 सेकंदपर्यंत थोडय़ा लांब अंतरापर्यंत पहा, डोळे शक्यतो बंद करा, तुम्ही जे काम करत आहात त्याची मनात उजळणी करा, संगणकाचा ब्राईटनेस म्हणजे प्रकाश फार वाढवू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोबाईलवर प्रिंट वाचण्याची सवय चुकीची आहे. मोठय़ा प्रिंट्स मोबाईलवर वाचू नका.
काही जणांना मोबाईलचा फॉन्ट अत्यंत लहान ठेवण्याची सवय असते. ती पूर्णतः चुकीची आहे. त्याने डोळय़ांच्या क्षमतेवर निश्चितच परिणाम होतो, असे डॉ. शिल्पा कोडकणी यांनी सूचित केले.
कोणताही स्क्रीन 25 इंच दूर ठेवा.
या संदर्भात महत्त्वाच्या टिप्स देताना त्या म्हणाल्या, आपल्यापासून संगणक किंवा कोणताही स्क्रीन 25 इंच दूर ठेवा. खोलीत अंधार करून टीव्ही पाहू नका, डोळय़ांच्या पातळीपेक्षा 15 अंश खाली पहा, नेत्रतज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे डोळय़ांमध्ये आयड्रॉप्स घाला. एसीचा थेट प्रवाह आपल्या डोळय़ात टाळा, स्क्रीन एका लहान कोनात फिरवून घ्या, डोळे मिटा, फिरवा, उघडा व बंद करा, दर 20 मिनिटांनी 20 फुटांच्या अंतराने 20 सेकंद पाहात रहा, अशा महत्त्वाच्या टिप्सही त्यांनी दिल्या.
चौकट करणे
डोळय़ांच्या आरोग्यासाठी टिप्स
लहान मुलांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याची गरज नाही. मात्र, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सध्या त्याशिवाय पर्याय नाही. लहान मुलांच्या बाबतीत त्यांच्या पालकांनी ऑनलाईन अभ्यासक्रम समजून घ्यावा आणि तो मुलांना शिकवावा. ज्यांना सतत स्क्रीनसमोर काम करावे लागते त्या सर्वांनी डोळय़ांच्या आरोग्यासाठी उपरोक्त टिप्सचा अवलंब करावा.
: दर 20 मिनिटांनी 20 सेकंदपर्यंत दूर अंतरापर्यंत पहा
: स्क्रीनपासून कमीत कमी 25 इंच दूर रहा
: डोळय़ांच्या पातळीपेक्षा 15-50 अंश खाली पहा
: आपल्या डोळय़ात एसीचा थेट प्रवाह टाळा
: डोळे मिटा, फिरवा, उघडझाप करत रहा









